Monsoon Update : ‘स्कायमेट’ने दिली चिंता वाढवणारी बातमी, मान्सूनबाबत महत्वाचे अपडेट
Monsoon Update : राज्यात नैऋत्य मान्सूनचे रविवारी आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाकडून त्यासंदर्भात घोषणा करण्यात आली. परंतु अजून पाऊस सक्रीय झालेला नाही. यासंदर्भात 'स्कायमेट' संस्थेने वर्तवलेला अंदाज चिंता वाढवणार आहे.
पुणे : बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यासंदर्भात उपाययोजना केंद्र अन् राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. परंतु शेतकरी ज्याची वाट पाहत आहे, तो मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. राज्यात मान्सून येऊन चार दिवस झाले आहेत. ११ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली होती. मान्सून सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे सांगण्यात आले आहे. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ८.८ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे खरिपाची पेरणी रखडली आहे. राज्यातील खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ०.७७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला फटका बसला आहे.
काय आहे स्कायमेटचा अंदाज
राज्यात नैऋत्य मान्सूनचे रविवारी आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाकडून त्यासंदर्भात घोषणा करण्यात आली. परंतु स्कायमेटचा अंदाज वेगळा आहे. देशात येत्या चार आठवड्यात तुरळक पाऊस पडणार आहे. म्हणजेच ६ जुलैपर्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स्कायमेटचा अंदाज खरा ठरल्यास भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात दुष्काळ पडू शकतो.
पावसाच्या मार्गात काय आहे अडथळे
यंदा अल निनोचा परिणाम पावसावर असणार असल्याचा अंदाज स्कायमेटने यापूर्वीच व्यक्त केला होता. आता अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने पहिल्यांदा केरळमध्ये पावसाचे आगमन लांबवले. त्यानंतर आता पर्जन्य प्रणालीच्या प्रगतीत अडथळा येत आहे. त्यामुळे द्वीपकल्पाच्या अंतर्गत क्षेत्रात मान्सून पोहोचण्यात अडथळे येत असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.
अजून मान्सून सक्रीय नाहीच
देशात १५ जूनपर्यंत अनेक ठिकाणी मान्सून सक्रीय झालेला असतो. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणाचा अर्धा भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार या भागात मान्सून दाखल झालेला असतो. यावर्षी १५ जून होऊन अजूनही मान्सून सक्रिय झालेला नाही. हा पाऊस ईशान्य आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत मर्यादीत राहिला आहे.
शेतकरी चिंतेत
पावसाने हुलकवणी दिल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने मान्सून आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी खते, औषधे, बियाणे खरेदीसाठी बाजार पेठेत लगबग सुरु झाली आहे.
हे ही वाचा
Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ नाव कसे पडले? कोणी दिले चक्रीवादळाला नाव