पुणेकरांवर भयानक संकट, ‘कपडे आणि ब्लँकेटची मदत करा’; सुप्रिया सुळे यांचं कळकळीचं आवाहन
सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना नुकसानग्रस्त भागातील बाधित नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. "मी पुणेकरांना विनम्र विनंती करते, आपण आपल्या परीने कपडे, ब्लँकेट अशी काहीतरी मदत करूयात", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक महिलांनी हंबरडा फोडला आहे. या परिसरात अद्यापही वीज सुरु झालेली नाही. याशिवाय सोसायट्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ भरला आहे. त्या अद्यापही स्वच्छ झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरीक खूप हतबल आहेत. या नागरिकांच्या घरातील सर्व सामानाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील इतर नागरिकांना नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी याबाबतचं आवाहन केलं. तसेच त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला.
“आता राजकारण करायचं नाही, आपली लोकं अडचणीत आहेत, लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलो आहोत. राजकारणासाठी खूप वेळ आहे. कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांनीदेखील जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पुन्हा एकदा स्थानिकांवर संकट आलं आहे. या संकटामुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. महिला रडत आहेत. मुलांच्या परीक्षा असतील, मुलांचे कागदपत्रे असतील, आताच एक महिला मला सांगत होती की, तिने कर्ज काढून फर्निचर केलं होतं. पण सारं उद्ध्वस्त झालं. याला जबाबदार कोण? अर्थातच हे महाराष्ट्राचं सरकार”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
‘थोडावेळ राजकारण, घरफोडी, पक्षफोडी बाजूला ठेवा’, सुप्रिया सुळे यांनी सुनावलं
“माझी या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की, थोडावेळ राजकारण, घरफोडी, पक्षफोडी बाजूला ठेवा. माणुसकी दाखवा. हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. माझी मागणी आहे की, या संपूर्ण भागातील नागरिकांसाठी एक वेगळं पॅकेजची घोषणा व्हावी. पाण्याच्या टाक्या तातडीने साफ झाल्या पाहिजेत. दिवसातून दोन ते तीन वेळा फवारणी झाली पाहिजे. स्वच्छ पाणी आणि वीजेची सोय ही सर्वात आधी झाली पाहिजे. यानंतर प्रत्येकाला आर्थिक मदत झाली पाहिजे. प्रत्येकाला एक महिन्याच्या धान्याचा पुरवठा झाला पाहिजे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांची कळकळीची विनंती
“मी पुणेकरांना विनम्र विनंती करते, आपण आपल्या परीने कपडे, ब्लँकेट अशी काहीतरी मदत करूयात. माझी कलेक्टर आणि पालिका आयुक्तांना विनंती आहे की, तुम्ही सुद्धा लोकांकडे अपील करा. मी अपील करते. आम्ही तर सुरु केलेलंच आहे. तुम्ही कपडे किंवा धान्य आम्हाला मदतीसाठी दिलं तर आम्ही प्रामाणिकपणे ती मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवू”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
“शेवटच्या माणसापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल. त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. युद्ध पातळीवर काम चाललं पाहिजे. पुढच्या आठ दिवसांत वेगळा कॅम्प या ठिकाणी लावला जाईल. मुलांची सर्व कागदपत्रे बनवले जातील. आम्ही अन्नधान्यासाठी सर्वच काम करतोय. रात्रीही काल जेवण, पाणी पोहोचवण्यासाठी आमचे सर्व सहकारी काम करत आहेत. हे परत होता कामा नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे”, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.