राष्ट्रवादीत तुफान हालचाली, अजित पवार दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुण्यात भेट झालीय. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घडून आलीय. विशेष म्हणजे या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत अजित पवार यांच्या गटात महत्त्वाच्या हालचाली घडणार आहेत. अजित पवार यांच्या गटाची दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. तसेच अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घडामोडींदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार यांच्यात तासभर चर्चा झाली. यावेळी सुप्रिया सुळे या देखील तिथे उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
“अजित पवार यांची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यांना डेंग्यू झाल्यानंतर पोस्ट केअर, म्हणजे जरी रिपोर्ट नॉर्मल आले असले तरी प्लेटलेट्स बरेच दिवस बघाव लागतं. कारण अनेकवेळा डेंग्यूच्या केसमध्ये जास्त त्रास होतो. मला स्वत:ला काही वर्षांपूर्वी डेंग्यू झालेला आहे. त्यामुळे पोस्ट केअर ही महत्त्वाची असते. विकनेस खूप असतो. त्यामुळे काही दिवस दादांना काळजी घ्यावी लागेल. याशिवाय प्रदूषण इतकं वाढलं आहे, मी स्वत: दोन दिवस दिल्लीला होते. पुणे, मुंबई आणि दिल्ली या सगळ्या ठिकाणी अतिशय वाईट हवा आहे. त्यामुळे पोस्ट केअर घेणं जरुरीचं आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
‘अजित पवार दिल्ली दौऱ्यावर, सुप्रिया सुळे म्हणाल्या….’
यावेळी सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. “अजित दादा दिल्लीला गेले? हे मला माहिती नाही. अर्थात कुटुंबाचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम होता. हा प्रायव्हेट फॅमिली लंच होता. एनडी पाटील यांच्या पत्नी या शरद पवार यांच्या सख्ख्या बहीण आहेत. दोघांमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष बघायला मिळाला. पण वैयक्तिक नाते आणि प्रेमामध्ये तो संघर्ष आड येणार नाही. हे तर आमच्या घरातलं झालं. हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. आमची वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“वैयक्तिक मैत्री असते की नाही, मी तुम्हाला भाजप नेते प्रमोद महाजन आणि शरद पवार यांच्या मैत्रीचं उदाहरण देऊ शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मैत्री होती. आम्ही अनेक वर्ष भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या घरी जायचो. आम्ही आजही त्यांच्या घरी जातो. आमचे आजही अटलजींच्या कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.