MPSC चा घोळ, आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं, एमपीएससी विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे मांडल्या व्यथा
MPSC Student in Pune: प्रतिक्षा यादी, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत करण्यासाठी कायदा करावा. महागाईमुळे खानावळ परवडत नाही. वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात...अशा व्यथा शरद पवार यांच्यापुढे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.
पुणे शहरात एमपीएससी (MPSC) परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने आहेत. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून हे रात्रंदिवस एक करत अभ्यास करत असतात. परंतु महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) धोरणांचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. कधी परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाही, निकाल लागला तर नियुक्ती वेळेवर होत नाही, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे आपल्या व्यथा आणि घरातील परिस्थिती मांडली. आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं…असा प्रश्नच या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना विचारला.
असा झाला संवाद
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने “अस्वस्थ तरुणाईशी शरद पवार यांचा संवाद” कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीचा महिना आधीच निश्चित होता. त्यानंतरही एमपीएससी परीक्षेची तारीख जून महिन्यात ठेवली होती. आता ही परीक्षा रद्द केली. पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना दोन वेळचा डबा आणि अभ्यासिका लावताना विचार करावा लागतो. पुण्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी तुम्ही वेशांतर करुन सदाशिव पेठ किंवा नारायण पेठेत फिरा, असे लेशपाल जवळगे या विद्यार्थ्याने म्हटले.
एमपीएससीसाठी असा कायदाच करावा
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली उझमा शेख हिचे पितृछत्र हरपले. आईने संघर्ष करुन शिकवले. परंतु परीक्षेतील घोळाचा फटका बसत असल्याचे तिने म्हटले. ती म्हणाली, प्रतिक्षा यादी, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत करण्यासाठी कायदा करावा. विजय अंधाळे म्हणतो, प्रत्येक वेळी आम्ही अभ्यास करतो. मात्र परीक्षा रद्द होते किंवा पेपरफुटीचा प्रकार घडतो. त्यानंतर नवे वेळापत्रक येते. महागाईमुळे खानावळ परवडत नाही. वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात.
शरद पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आता निवडणुकीनंतर या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.