डॉक्टराच्या जिद्दीला सलाम, अपघातात स्वत: जखमी झाले, पण एक जीव वाचवण्यासाठी सुरु ठेवला प्रवास
Pune News : मुंबईतील डॉक्टर संजीव जाधव यांनी एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी कमालीची जिद्द दाखवली. डॉक्टर संजीव जाधव रुग्णावाहिकेतून फुप्फुस घेऊन जात होते. त्यावेळी रुग्णावाहिकेचा अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. परंतु त्याच परिस्थितीत ते चेन्नईला पोहचले. त्यांनी चेन्नईत शस्त्रक्रिया यशस्वी केली.
पुणे, दि. 23 नोव्हेंबर | आपल्याकडे डॉक्टरास ईश्वराचे रुप मानले जाते. डॉक्टर तुमच्या मुळेच आमच्या रुग्णाचे प्राण वाचले, अशी भावनाप्रधान प्रतिक्रिया अनेक रुग्णाचे नातेवाईक देतात. अनेक डॉक्टर आपल्या खासगी आयुष्यापेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य देतात. परंतु हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी जिद्दीची परिसीमा गाठली. डॉक्टर जाधव जखमी झाले होते. परंतु आपल्या जखमांपेक्षा त्यांनी रुग्णाचे प्राण वाचवणे महत्वाचे समजले. जखमी अवस्थेत पुणे विमानतळावरुन ते चेन्नईला पोहचले. रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. संजीव जाधव यांच्यासारख्या अनेक डॉक्टरांमुळे डॉक्टरांना पृथ्वीवरील भगवान म्हटले जाते.
रस्त्यात रुग्णावहिकेचा अपघात
मुंबई येथील डॉक्टर संजीव जाधव पिंप्री चिंचवड येथील डी.वाय.पाटील रुग्णालयातून एका रुग्णाचे फुप्फुस ( Lungs) घेऊन निघाले होते. हॉस्पिटलवरुन पुणे विमानतळावर त्यांची रुग्णावाहिका धावत होती. त्यावेळी त्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात डॉक्टर संजीव जाधव व इतर जण जखमी झाले. परंतु त्या परिस्थिती ते थांबले नाही. त्यांनी दुसरी गाडी मागवून प्रवास सुरु ठेवला. जखमांवर प्रथमोपचार करुन पुणे विमानतळावर पोहचले. त्या ठिकाणी विशेष विमान तयार होते. त्या विमानातून ते चेन्नईला पोहचले.
चेन्नईतील युवक 72 दिवसांपासून लाइफ सपोर्टवर
चेन्नईत एक युवक 72 दिवसांपासून लाइफ सपोर्टवर होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तसेच फुप्फुस वेळेवर चेन्नईत पोहचले नसते तर ते निकामी झाले असते. यामुळे डॉक्टर संजीव जाधव यांनी आपल्या जखमांकडे लक्ष न देता चेन्नई गाठले आणि शस्त्रक्रिया केली. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली त्याला फुप्फुसचा कर्करोग झाला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाला नसते तर त्याचा मृत्यू झाला असता. कारण त्याला ऑपरेशन टेबलवर आणले गेले होते. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टर संजीव जाधव यांनी सांगितले. पिंप्री चिंचवड येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये तातडीने फुप्फुस काढण्यात आले होते. त्यामुळे हॉस्पिटल ते पुणे विमानतळ असा ग्रीन कॅरिडोर तयार करण्यात आला नव्हता.