Mumbai Pune Express Highway : चतुर्थीसाठी जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर स्वतंत्र लेन! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
याआधीच गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीही देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाची झालेली चाळण पाहता, अनेक जण कोकणात जाण्यासाठीही मुंबई-पुणे द्रूतगती मार्गालाच पसंती देत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे : गणेशोत्सवासाठी (Ganpari Festival) आता अवघे काही तास उरले आहेत. तयारी जोरात सुरु आहे. चाकरमन्यांची गावाला जाण्यासाठी धावपळ, लगबग पाहायला मिळतेय. अशातच संभाव्य वाहतूक कोंडीचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर होत असलेल्या वाहतूक कोंडीची (Mumbai Pune Express Highway Traffic Alert) मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलनाक्यावर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना एक विशेष स्वतंत्र मार्गिका ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे टोलनाक्यांवर वाहतुकीची होणारी कोंडी टळेल. तसंच गणेशोत्सवासाठी निघालेल्या गणेशभक्तांचाही प्रवास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालापूर टोलनाक्याला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी याठिकाणी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना केल्यात. तसंच मनुष्यबळ वाढवणं, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणं, अपघात झाल्यास तातडीने उपाययोजना करत मदत पुरवणं, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांची खालापूर टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांशी चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खालापूर टोलनाक्याला भेट दिली. यानंतर त्यांनी खालापूर टोल नाका परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांसोबत आणि पोलिसांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान, त्यांनी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावर स्वतंत्र मार्गिका करण्याबाबत सांगितलं. दरम्यान, याआधीच गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीही देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाची झालेली चाळण पाहता, अनेक जण कोकणात जाण्यासाठीही मुंबई-पुणे द्रूतगती मार्गालाच पसंती देत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आधीच खबदारीची पावलं उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कायमस्वरुपी तोडगा काढावा
शनिवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर या मार्गावरील दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अमृतांजन पुलाजवळ सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी पाहता, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशीही मागणी वाहनचालकांकडून केली जातेय. दरम्यान, शनिवारी एका दिवसासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणार्या वाहनांना टोलमाफीदेखील देण्यात आलेली होती.