नाशिकचे इच्छुक उमेदवार धनराज विसपुते नाराज?, राधाकृष्ण विखेपाटील म्हणतात,…
नाशिकमध्ये धनराज विसपुते यांना उमेदवारी मिळेल, असं वाटत होतं. पण, त्यांना अद्याप एबी फार्म मिळाला नाही. त्यावर बोलताना विखेपाटील म्हणाले, कुणालाही डावलण्याचा प्रश्न नाही.
पुणे : महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील (Radhakrishna Vikhepatil) म्हणाले, नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला ही चांगली गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय होईल. सत्यजित तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला की नाही, हे मला माहीत नाही. भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार आहेत. पक्षानी ठरविलं तर ती उमेदवारी स्वतंत्र करता येईल. अंतिम निर्णय पक्षश्रेष्टी घेतील. सत्यजित तांबे यांना पक्षानं ठरविलं की, अधिकृत उमेदवार करायचा तर त्यालाही आमची हरकत नसल्याचंही राधाकृष्ण विखेपाटील यांनी सांगितलं.
सत्यजित तांबे म्हणाले की, मी सर्व नेत्यांना भेटणार. परंतु, याबाबचा निर्णय भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. गिरीश महाजन आणि मी त्याचा विचार करू.
जिंकणाऱ्या उमेदवाराचा विचार
नाशिकमध्ये अद्याप भाजपनं एबी फार्म दिला नाही. पक्षाच्या दृष्टीनं जो विनिंग कँडीडेट असेल, त्यांचा विचार केला जाईल. पक्षाचं काम करणाऱ्या उमेदवाराला पुरस्कृत करायला काहीच हरकत नाही, अशी आपली भूमिका आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात पक्षाची स्थिती चांगली आहे. त्यामुळं नाशिकमध्ये काँग्रेसला बायपास करण्याचा प्रश्न येत नसल्याचंही विखेपाटील यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं जागा वापट करून घेतल्या. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. नाशिक आणि अमरावतीत आम्ही अंतर्गत अदलाबदल केलेली नाही.
कुणालाही डावलण्याचा प्रश्न नाही
नाशिकमध्ये धनराज विसपुते यांना उमेदवारी मिळेल, असं वाटत होतं. पण, त्यांना अद्याप एबी फार्म मिळाला नाही. त्यावर बोलताना विखेपाटील म्हणाले, कुणालाही डावलण्याचा प्रश्न नाही. अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केली होती. अंतिम निर्णय शेवटी पक्षश्रेष्टी घेतील. उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं.
भाजपात आले तर स्वागतचं
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दोन दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल. सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये यावं किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतचं आहे, असंही ते म्हणाले.
काँग्रेसची नेहमीच अडचण होत आली आहे. काँग्रेसची भारत जोडो नव्हे, ती भारत छोडो यात्रा होती, अशी टीकाही विखेपाटील यांनी केली. सत्यजित तांबे यांचं नेटवर्क चांगलं आहे. उमेदवारीसाठी लक्ष्मणरेषा आखलेली नाही. प्राप्त परिस्थितीत पक्ष मोठा होता असेल तर विचार करायला काही हरकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.