आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या पडद्यामागे बैठका पार पडत आहेत. कोणता पक्ष कुठल्या आणि किती जागांवर लढेल? याबाबत या बैठकींमध्ये ठरवलं जात आहे. असं असताना काही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच होताना बघायला मिळत आहे. भाजपच्या पुणे जिल्ह्यातील दोन जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसा ठराव करण्यात आला आहे.
भाजपच्या भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी बैठक घेत याबाबत दावा केला. अण्णा बनसोडे यांच्याकडून पिंपरी मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या भोसरीतून भाजपचे महेश लांडगे हे आमदार आहेत. तर चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनंतर अजित पवार गटाने नवा ठराव मंजूर केलाय. भाजपने बैठक घेऊन पिंपरी विधानसभेवर दावा केला. त्यानंतर आज अजित पवार गटाने ही बैठक घेतली आणि भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी-चिंचवड राष्ट्रवादीला घेण्याचा ठराव मंजूर केला. तसेच भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्ही भोसरी आणि चिंचवडमध्येही प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशाराही द्यायला अजित पवार गट विसरला नाही. या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे स्वतः उपस्थित होते. भाजपने अण्णा बनसोडे यांचा तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे आता बनसोडे समर्थक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली. “कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, पिंपरी आणि चिंचवड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ला आहेत तो आम्ही महायुतीतून लढवणारच आहोत. पण चिंचवड आणि भोसरी हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत. कारण दोन्ही मतदारसंघात 2007 पासून अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता होती. तसेच 2012 ला 93 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फार मोठी आहे. या तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, असा आम्ही ठरावाच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडे विनंती करु”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.