अजित पवार यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी, महामंडळ नाकारत बड्या नेत्याची मोठी मागणी
मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापू भेगडे यांनी अजित पवार यांच्याकडून उमेदवारीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांची कृषी शिक्षण, संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरही त्यांनी हे पद नाकारले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारलं आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बापू भेगडे ठाम आहेत. भेगडे यांची कृषी शिक्षण, संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण अजित पवारांनी महामंडळ नाकारलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला मावळमधून उमेदवारी जाहीर करावी, असं बापू भेगडे यांनी म्हटलं आहे. “मला काही महामंडळ नकोय. मी ज्या गोष्टीची मागणी त्या मतावर ठाम आहे. माझ्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझे कार्यकर्ते ठाम आहेत. म्हणून मी आज पत्रकार परिषद बोलावली आहे”, असं बापू भेगडे यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारी वरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आपण या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको, असं बापू भेगडे यांनी स्पष्ट केलं आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढणार?
“आपण मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी”, अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही भूमिका मांडली. पण यामुळे आता विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला अजित पवार गटातूनच विरोध असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
अजित पवारांची शिरुरमध्येही डोकेदुखी वाढणार?
दरम्यान, अजित पवार यांची शिरुरमध्येदेखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिरूरमध्ये आयात उमेदवार नको, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. पक्षाने आयात उमेदवार दिल्यास बंडखोरीची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ही भूमिका निश्चित करण्यात आली. दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांना अजितदादा गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके अजितदादा गटात प्रवेश करून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.