Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा रोहित पवार यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने रोहित पवार यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या, याबाबत आमदाराने मोठा दावा केलाय.
रणजित जाधव, Tv9 मराठी, पुणे | 22 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. शरद पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं, अशी विनंती राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटाकडून करण्यात येत आहे. पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या पाठीमागे न उभे राहता आपल्या आजोबांच्या मागे उभे राहिले आहेत. रोहित पवार भाजपवर सडकून टीका करत आहेत. पण अजित पवार यांच्या समर्थक आमदाराने रोहित पवार यांच्यााबबत एक मोठा दावा केलाय.
“उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागाही घेऊ पाहत आहेत”, असा गौप्यस्फोट अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केलाय.
सुनील शेळके यांचा नेमका दावा काय?
“20 जून 2022ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर, दोन दिवसांनी म्हणजे 22 जून 2022 चा तो दिवस होता. त्या दिवशी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजित पवार यांच्याकडे गेले. मात्र त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच, रोहित पवार आम्हाला शरद पवारांकडेही घेऊन गेले, असा मोठा दावा सुनील शेळेकेंनी केलाय. त्यामुळं रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये’, असा सल्ला शेळकेंनी दिलाय.
‘आता आम्ही सत्तेत गेल्यावर रोहित पवार शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहतायेत. पण शरद पवार यांच्या जवळचे दादा हे फक्त अजित दादाच असू शकतात. अन्य कोणत्याही दादांना ते जमणार नाही’, असं सुनील शेलके म्हणाले आहेत. सुनील शेळके यांच्या या गौप्यस्फोटावर आता रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित पवार यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण या बालेकिल्ल्यात सभा आहे. या सभेत रोहित पवार सुनील शेळके यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.