‘अरे बापरे! …म्हणजे मी मरुन जाणार?’, असं का म्हणाले अजित दादा?
"अरे बापरे 440 चा करंट म्हणजे मी मरुन जाणार. अरेरे, मी आता माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल", अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावला.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना प्रत्युत्तर दिलं होतं. चिचंवड पोटनिवडणुकीत भाजपच्या चिन्हावर असं बोट दावा की, अजित पवारांना 440 चा करंट लागला पाहिजे, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं. त्यांच्या या विधानाला अजित पवारांनी मिश्किल शब्दांत उत्तर देत खिल्ली उडवली. “अरे बापरे 440 चा करंट म्हणजे मी मरुन जाणार. एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतोय. अरेरे, मी आता माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल”, अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावला.
“चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणावं जरा ताळमेळ असायला हवं. आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच आपल्याला बोलायला संधी मिळाली म्हणून काहीही उचलली जीभ आणि लावली टाळ्याला करु नये. काहीतरी तारतम्य ठेवा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका”, असा सल्ला अजित पवारांनी दिला.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?
चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आधी राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा मतदारसंघ भाजपाकडे आला. मात्र, लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात या निवडणुकीत प्रमुख लढत होत आहे.
या मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तळ ठोकून आहेत. त्यांनी मतदारसंघात मॅरेथान दौरे सुरु केले आहेत. या प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी 26 तारखेला इतक्या जोरात बटन दाबा की अजित पवार यांना 440 चा करंट लागला पाहिजे. पुन्हा त्यांनी चिंचवडचे नाव घेता कामा नये अशी टीका केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवार काय म्हणाले?
“केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचा दिलेला निकाल हा अतिशय अनपेक्षित निकाल आहे. मलाच प्रश्न पडलाय की, ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली त्यांच्याच मुलाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव हिसकावण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कष्टकरी समाजाला न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली होती”, असं अजित पवार म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे देतो, असं सांगितलं होतं. पण आज निवडणूक आयोगाने निकाल देत असताना ठाकरेंच्या मुलाकडूनच पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं. ज्यांनी फूट पाडली त्यांना नाव आणि चिन्ह मिळालं. उद्धव ठाकरे कदाचित या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जातील. आम्ही सगळे महाविकास आघाडीचे मित्र म्हणून सोबत आहोत. फक्त आम्हीच नाहीत तर जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आहे”, असं अजित पवार म्हणाले.