‘मग चोरुन शपथ का घेतली?’ शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांविरोधात चांगलेच दावे-प्रतिदावे सुरु आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी शरद पवार आपल्यासोबत सत्ता स्थापन करणार होते. पण ऐनवेळी त्यांनी पाठ दाखवली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलाय. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठमोठे दावे केले होते. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी पाठ फिरवल्यानंतर आपले राष्ट्रवादीसोबत बोलणं झालं होतं. शरद पवार यांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व ठरलं होतं. पण ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. शरद पवार यांनी डबलगेम केला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा होता तर चोरुन शपथ का घेतली? असा सवाल त्यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय”, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.
‘…तर चोरुन पहाटे का शपथ घेतली?’
“देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.
“आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असं महत्त्वाचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.
‘विकेट दिली तर करायचं काय?’
“हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे”, असंही पवार यावेळी म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांची अस्वस्थता बाहेर येणं गरजेचं होतं. विकेट गेलेला माणूस विकेट गेली कसं सांगतो? गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली”, असं शरद पवार म्हणाले.