भावनांचा बांध फुटणार? एकाच मंचावर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया ताई, अजित दादा एकत्र येणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी 22 ऑक्टोबर ही तारीख फार महत्त्वाची असणार आहे. कारण या दिवशी दोन्ही गटाचे दिग्गज नेते समोरासमोर येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
पुणे | 18 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी फूट पडलीय. पक्ष दोन गटात विभागला गेलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्ष दोन गटात विभागला गेलाय. पक्षाच्या सर्वाधिक आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध केलाय. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व सहकाऱ्यांनी जी भूमिका घेतलीय ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. संबंधित भूमिका पक्षाची नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. पण अजित पवार यांच्या गटाने पूर्ण पक्षावरच दावा केलाय. त्यामुळे दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरु झालीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांची आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात लढाई सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेसारख्याच घडामोडी घडत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीत काही गोष्टींमध्ये साम्यता असली तरी काही गोष्टी या वेगळ्या घडल्या आहेत. कारण पक्षात फूट पडल्यानंतरही अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांची याआधी भेट घेतलीय. या सर्व नेत्यांनी शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली. पण शरद पवार यांनी ती विनंती फेटाळली.
अजित पवार गटाचा शरद पवारांवर गंभीर आरोप
अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांनीदेखील शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली. पण तरीही ते आले नाहीत. या सर्व घडामोडींनंतर निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शरद पवार हे पक्षात मनमानी करतात. पक्षात निवडणूक पद्धतीने नियुक्ती केली जात नाही. एका सहीने नियुक्ती केली जाते, असा आरोप अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला.
शरद पवार हे पक्षात हुकूमशाह सारखे वागतात, असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला. अजित पवार गटाचा हा युक्तिवाद शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे भर पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आता दोन्ही गटाचे दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.
पवार कुटुंबिय एकाच मंचावर एकत्र येणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. अनंतराव पवार इंग्लिस स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पवार कुटुंबिय एकत्र येणार आहेत. भिगवणमध्ये 22 ऑक्टोबरला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तीनही नेत्यांची नावे आहेत.
भावनांचा बांध फुटणार?
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य केलं होतं. अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींवर बोलताना सुप्रिया ताईंना अश्रू अनावर झाले होते. सुप्रिया सुळे यांना यावेळी रडू कोसळलं होतं. त्यामुळे आता प्रत्यक्ष या कार्यक्रमात अजित दादा देखील असणार आहेत. याशिवाय शरद पवारांची देखील हजेरी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.