शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी महत्त्वाच्या दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. पण दुपारी दोन वाजेच्या सुमारास शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली.
पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी महत्त्वाच्या दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. पण दुपारी दोन वाजेच्या सुमारास शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी कार्यक्रमस्थळी येऊन शरद पवारांची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला.
शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे पुढच्या काही दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार उद्या पुरंदरच्या दौऱ्याला जाणार होते. पण डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे शरद पवारांचा पुरंदरचा दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार यांना सर्दीचा त्रास जाणवत होता, अशीदेखील माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांची सध्या प्रकृती बरी असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार सध्या बारामतीत आपल्या घरी आराम करत आहेत. तसेच ते तब्येत बरी होईपर्यंत बारामतीतच आराम करणार असल्याची माहिती मिळत आहे.