Sharad Pawar | ‘संघटना स्वच्छ झाली’, शरद पवारांचा अजित पवारांना सर्वात खोचक टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या गटावर जोरदार टोले लगावले. कुणी सोडून गेले याचा जास्त विचार करु नका. याउलट संघटना स्वच्छ झाली. आता तरुणांना जास्त संधी देईल, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी 1978 चा आपला अनुभव सांगितला.
पुणे | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील आमदारांचा भलामोठा गट सोबत घेऊन पक्ष फोडला. पण शरद पवारांनी या घटनेला जास्त महत्त्व न देण्याचा सल्ला तरुणांना दिला. या घटनेमुळे उलट तरुणांना संधी दिली जाईल, असं शरद पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या फुटीच्या घटनेवर त्यांनी 1978 साली घडलेल्या घटनेचा इतिहास सांगितला. तसेच अजित पवार यांच्या बंडाच्या घटनेवर शरद पवारांनी संघटना स्वच्छ झाली, असा टोला लगावला.
“मला आठवतंय, मी 1978 साली तरुण लोकांना मोठी संधी देवून निवडणुकीच्या रणांगणात घातलं. निवडणुका झाल्यानंतर सरकार दुसऱ्याचं आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. मी परत आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. 60 आमदार निवडून आले होते. त्यातील 6 शिल्लक राहीले. बाकीचे सर्व अन्य पक्षात गेले. त्यामुळे साहजिकच होतं की, 60 वरुन 6 वर आलो”, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
’60 पैकी 51 ते 52 लोक निवडणुकीत पराभूत’
“लोकांना वाटलं होतं की, आता आपले विचार संपतील. पण हा विचार गांधी, नेहरुंचा विचार होता. हा विचार यशवंतराव चव्हाणांचा विचार होता. हा विचार शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार होता. तो संपू शकत नाही. नवीन पिढी उभी केली. नंतरच्या काळात निवडणुका झाल्या. या निवडणुकानंतर जे 60 लोक पक्ष सोडून गेले होते त्यापैकी 51 ते 52 लोक निवडणुकीत पराभूत झाले. याचा अर्थ स्पष्ट झालं की, लोकांना ते आवडलेलं नव्हतं”, असं शरद पवारांनी सांगितलं.
“पुन्हा एकदा आपण नवीन पिढी केली होती, पुढच्या निवडणुकीत 76 लोक निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आपण वेगळी दिशा देऊ शकलो होतो. याचं उदाहरण सांगायचं कारण एवढंच, कुणी गेलं तरी याची चिंता करण्याचं कारण नाही. शेवटी सामान्य लोकांमध्ये त्यांची भूमिका मांडून, त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी जे यशस्वी झाले, लोक त्यांच्याबरोबर राहत असतात. ती अवस्था या महाराष्ट्रात बघायला मिळेल”, असा दावा शरद पवारांनी केला.
‘संघटना ही स्वच्छ व्हायला लागली’
“जे काही घडलं याची चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे संघटना ही स्वच्छ व्हायला लागली. त्याही पेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. युवकांची संघटना आपण मजबूत करु शकलो तर माझी खात्री आहे की, उद्या निवडणुका होतील त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस युवकची एक फळी निर्माण झालेली असेल. ते राज्य चालवतील, लोकांची प्रश्न सोडवतील. ही परिस्थिती नक्की येईल”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
“तुम्हा सर्वांना नवीन संधी मिळाली आहे. आपला विचार शेवटपर्यंत पोहचवण्याचं काम करूया. नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याची तुमच्यात क्षमता आहे. काही लोकांनी नवे प्रश्न तयार केलेत, टीका केली. त्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज नाही. जेव्हा लोकांमध्ये जाणार तेव्हा काही प्रश्न लोकं विचारणार म्हणून ते आज बोलत आहेत. सत्ता येते आणि जाते, सामान्य लोकांचा पाठींबा महत्वाचा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“तुमचा कार्यक्रम काय होता, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आता कुणासोबत गेला आहात, अशी प्रश्न लोक विचारणार. लोकसभेची निवडणूक 3 ते 4 महिन्यांवर आली आहे. वेगळं वातावरण तयार करण्याचं काम कुणी करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचं काम तुम्ही करा”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.