कर्जत, पुणे | 1 डिसेंबर 2023 : बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. पाच राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे. कर्जत येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाचा हा शेवटचा आणि दुसरा दिवस आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, ही आपली इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. जास्तीत जास्त खासदार निवडून आपणास आणावे लागणार आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन ७ फेब्रवारीपासून होत आहे. त्यात पूर्णअर्थसंकल्प मांडता येणार नाही. परंतु महत्वाच्या कामांना निधी मंजूर केले जाणार आहे.
आमच्यावर आरोप होते की गुन्हे दाखल होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. विकास कामे व्हावी, यासाठी आपण सरकारमध्ये आला आहोत. माझ्यावर जे आरोप झाले ते निर्णय मी एकट्याने घेतले नव्हते. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी होती.
मंत्रालयात भेटीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आमदार यांच्यानंतर मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महत्वाचे असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी सरकार असले म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्रोम ठरवला जातो. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्री करता आले नाही, म्हणून ते नाराज झाले. परंतु त्यांना समजवले. त्यांना कार्यध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिले. आता शब्द दिला म्हणजे तो अंमलात आणावेच लागणार आहे. शब्द देताना दहा वेळा विचार करा, असे अजित पवार यांनी सांगितले.