सर्वात मोठी बातमी, अजित पवार यांची स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा, महायुतीचं काय होणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर सर्वात मोठी घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचं काय होणार? असा प्रश्न आता निर्माण होतोय.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेत आहेत. विशेष म्हणजे देशात नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढले. या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन काही ठिकाणी मतभेद होताना दिसले. पण तीनही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकही हे पक्ष एकत्र लढवणार आहेत. असं असलं तरी अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या घोषणेनुसार घटना घडल्या तर महायुतीमधील मित्रपक्षांचे उमेदवारच महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये परस्परांच्या विरोधात उभे राहू शकतात.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांनी आज याबाबबतची मोठी घोषणा केली. स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा”, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. “आपण लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत”, असं अजित पवार स्पष्ट म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणूक कधी होणार? अजित पवार म्हणाले…
“आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते. पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही. सर्व गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जातात. पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला. विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाही. प्रश्न सुटत नाहीत. काहीजण तिकडे गेले. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो. अनेक जण पक्षात आले आहेत. त्यांचं स्वागत करतो. अंदाज आहे की विधानसभा निवडणुका या ऑक्टोबर शेवटपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात होतील. पुण्यात राज्यातील सर्वात मोठं एक दिवसीय शिबीर घ्यायचे आहे. बालेवाडी येथे बुकिंग करण्याचे कार्यकर्त्यांना सागितलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचे कार्यकर्त्यांना काय आदेश?
“दूध, गॅस, लाडकी बहीण इतर सर्व योजना आहेत. यावर आता ७५ हजार कोटी सरकार योजनेवर खर्च करत आहे. अजित दादाचा वादा आहे, मी वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळ हवं असेल, या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या. काम कसं करून घ्यायचं ते मी बघतो. केंद्रात एनडीए सरकार आहे. तसं राज्यात आलं तर आम्ही काही चर्चा मोदी, शाह यांच्याशी केला आहे. केंद्राशी काही योजनांबाबत चर्चा झाली आहे. योजना करताना करोडो रुपये लागतात. रिंग रोड, मेट्रो काम अजून करायची आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“पुणेकरांना थोडा त्रास होत आहे. काही कामे सुरू आहेत. पण आपण कामाला गती देत आहोत. वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. पण थोडे दिवस कळ काढा. मी कसं करतो बघा. मुलभूत गरजा पूर्ण करू. मी राज्यातील ५ दिवस राज्यात आणि २ दिवस मुंबईमध्ये असेल. आता झोकून काम करावं लागणार आहे. अल्पसंख्याक समाजाचं मत परिवर्तन करावं लागणार आहे”, असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
“कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या मदतीसाठी माता-भगिनी, मुलींकडून पैसे घेऊ नका. अधिकारी घेत होते. त्यांना डिसमिस केलं. पारदर्शकता कशी येईल याकडे लक्ष द्या. काही जण म्हणत आहेत दीडच हजार दिले. पण तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय दिलं का? काही सूचना केल्या त्या योग्य असतील तर आम्ही करायला कमी पडणार नाहीत. कौशल्य विकास कार्यक्रमात तरुण तरुणींना सांगा. त्यांना राज्य सरकार प्रमाणपत्र देणार आहे”, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.
शरद पवारांना बोलू दिलं नाही? अजित पवार म्हणाले…
“२००४ पासून मी पालकमंत्री काळात काम केलं. मी आरोप-प्रत्यारोपाला उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले, असं बोललं जात होतं. आधी बारामती, शिरूरला निधी दिला. त्यावर कोणी बोलत नाही. कालच्या बैठकीतही मी सगळ्या आमदार-खासदारांना बोलू दिलं. पण कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. मीडिया पुढे काहीतरी वेगळं मांडण्यात आलं. वडीलधाऱ्यांना बोलू दिलं जातं नाही, असं सागितलं गेलं. पण तसं काही नाही. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली”, असं अजित पवार म्हणाले.
“मीडियाबाबत सावध रहा. मीडियावर काही बदनामी केली जाते. पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या. त्या सर्वांवर कारवाई केली आहे. अतिक्रमण करून धंदे करणार असेल तर चालणार नाही. गैरप्रकार झाला तर कारवाई केली जाईल. नियमावलीत भेदभाव नाही. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरीचे आमदार सूनील टिंगरे यांची तीन-चार वेळा चौकशी झाली. पण त्यातून काही समोर आलं नाही. त्यामुळे उगाच बदनामी केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावं लागत. यापुढे डीपीडीसीच्या बैठकीत पत्रकारांना बसवणार आहे. आपण भेदभाव करत नाही करणार नाही.”