योगेश बोरसे, पुणे | 26 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करुन अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. सरकारमध्ये गेल्यानंतर अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदे मिळाली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या समावेश झाल्यानंतर अनेक दिवस खाते वाटप झाले नव्हते. अजित पवार अर्थखात्यासाठी अडून बसले होते. शिंदे गटाचा त्यांना अर्थखाते देण्यास विरोध होता. अखेर खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखातेच मिळाले. त्यानंतर अजित पवार यांची नाराजी दूर झाली.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे होते. परंतु पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना हवे होते. अजित पवार यासाठी आडून बसले होते. त्यामुळे अनेक दिवस पालकमंत्रीपदासाठी जिल्ह्यांचे वाटप झाले नव्हते. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते. शेवटी याठिकाणी भाजपला तडजोड करावी लागली. दोन दादांमध्ये पुन्हा अजित पवार वरचढ ठरले. त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी दिली गेली.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला चार ते पाच खाते मिळणार आहे. त्यात गृहनिर्माण खात्यासाठी अजित पवार गट आक्रमक झाला आहे. गृहनिर्माण खात्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. सध्या अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. गृहनिर्माण खाते सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महत्वाचे खाते आहे. त्यामुळे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. यापूर्वी दोन वेळेस अजित पवार यांची मागणी मान्य झाली होती. आता गृहनिर्माण खातेही भाजप त्यांच्यासाठी सोडणार आहे का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. हे खाते मिळाले नाही तर अजित पवार नाराज होतील का? हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे.