‘तुमचं नाव शरदराव म्हटल्यावर मला ऐकावं लागेल’, अजित पवारांनी वकिलाचा किस्सा सांगितला आणि एकच हशा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका वकिलाचा किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार इंदापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी विकलाचा किस्सा सांगितला. यावेली अजित पवार यांनी उद्या पुण्यात सभा होणार असल्याची माहिती दिली. तसेच बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचाही उमेदवारी अर्ज उद्या भरणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एक किस्सा सांगितला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. अजित पवार हे महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय दुरावा आला आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड पुकारत वेगळा निर्णय घेतला आहे. ते सत्तेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गडाकडून अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी शरद नावाबाबतचा एक किस्सा सांगितला. शरदराव नावाच्या वकिलांनी वकिलांसंदर्भात मागणी केली असता तुमचं नाव शरदराव आहे म्हटल्यावर मला ऐकावे लागेल असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
“उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल आणि अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत पुण्यात सभा होणार आहे. उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. सातारा आणि सांगली येथे महायुतीच्या उमेदवाराचा मी आणि देवेंद्र फडणवीस उद्या उपस्थित राहणार आहोत”, अशी माहिती अजित पवारांनी दिली. तसेच “बारामतीप्रमाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात महिन्याला विकासकामासाठी एक दिवस देणार”, असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी जनतेला दिलं.
अजित पवार यांची राहुल गांधींवर टीका
“लोकसभा निवडणूक ही 140 कोटी जनतेची निवडणूक आहे. गावकीची निवडणूक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशासनावर पकड आहे. पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला. कुणाचा फायदा होईल. पण कुणी फायदा केला याचा विचार करा”, असं अजित पवार नागरिकांना उद्देशून म्हणाले. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाईलाजाने नाव घ्यावे लागते. मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही”, अशी टीका अजित पवारांनी केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा आज इंदापूर शहरामध्ये डॉक्टर संघटना, वकील संघटना आणि व्यापारी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या तीनही बैठका झाल्यानंतर अजित पवार हे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार, असा दौरा निश्चित आहे.