राज ठाकरे यांचा चिंचवड, कसब्यात भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादी म्हणते, बोलघेवडे पोपट ईडीच्या…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसबापेठ काबीज करण्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत. बावनकुळे आज संपूर्ण दिवस कसबा मतदारसंघासाठी देणार आहेत.
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्यावर मनसे आता काय प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. जगताप यांच्या या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नाराजी नाट्य
प्रचार सभेच्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो नसल्यामुळे कसब्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगले आहे. कसब्यातील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या कोपरा सभेच्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब आहेत.
बॅनर्सवर शरद पवार, अजित पवारांचे फोटो नसल्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी व्यक्त केली नाराजी. नाराजी व्यक्त करत प्रशांत जगताप यांनी काँग्रेसच्या प्रचार सभेत सहभागी होणं टाळलं.
चार मेळावे घेणार
दरम्यान, कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यात येत आहेत. बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही देणार आहेत. बावनकुळे आज कसब्यात चार मेळावे घेऊन वातावरण ढवळून काढणार आहेत.
बावनकुळे मैदानात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसबापेठ काबीज करण्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत. बावनकुळे आज संपूर्ण दिवस कसबा मतदारसंघासाठी देणार आहेत. भाजपसोबत असलेल्या इतर पक्ष आणि संघटनांसोबतही बैठका घेणार आहेत. तसेच सकाळी 11.30 वाजता मीडियाशी संवादही साधणार आहेत.
पोलिसांचा रुट मार्च
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी काल रुट मार्च केला. स्थानिक पोलीस आणि एसआरपीएफची तुकडीने हा रुट मार्च केला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.
संपूर्ण कसबा मतदारसंघात पोलिसांची परेड करण्यात आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत.