अजित पवार यांना ज्याची भीती होती तेच घडायला लागलं? दुपारीच बोलले, संध्याकाळी घडूही लागलं
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईत बुधवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या मनातील धाकधूक व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मनातील एक भीती व्यक्त केल्यानंतर लगेच त्यांना अनपेक्षित असणाऱ्या घडामोडींची पहिली घटना संध्याकाळी घडली.
पुणे : महाराष्ट्रात आता भारत राष्ट्रीय समिती पक्ष अर्थात बीआरएस हा पक्ष आपली पाळेमुळे घट्ट रोवताना दिसत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे या पक्षाचे प्रमुख आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पक्षात आणखी काही माजी आमदारांनी पक्षप्रवेश केला. या पक्षात विविध पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे राज्यातील इतर पक्षांनादेखील धडकी भरु लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आजच्या भाषणात बीआरएस पक्षाला कमी समजू नका, असं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी याबाबत आज वक्तव्य केल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात दुपारी बीआरएस पक्षाबद्दल मत व्यक्त केलं. त्यांनी बीआरएस पक्षाकडे दुर्लक्षित करुन चालणार नाही, असं म्हणत धास्ती व्यक्त केली. त्यानंतर लगेच संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनपेक्षित अशी बातमी समोर आली. प्रसिद्ध तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. सुरेखा पुणेकर यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील बीआरएस पक्षात प्रवेश केला. सुरेखा यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता. त्या राष्ट्रवादीत होत्या. पण अचानक त्यांनी आता बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.
अजित पवार बीआरएस पक्षाबद्दल नेमकं काय म्हणाले?
“उद्याच्या निवडणुकीत बीआरएस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवलं. कारण मागच्या काळात फक्त वंचित पक्ष होता. त्याचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बसला. आपले जे आमदार-खासदार काठावर निवडून येतात ते अडचणीत आले”, असं मत अजित पवार यांनी मांडलं. “आता माझा अंदाज आहे, तिथे एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. त्यांनी त्यांच्या राज्यात जेवढं लक्ष नाही त्यापेक्षा जास्त लक्ष आपल्या राज्यात आहे. कुणालाही फोन करतात, कुणाशीही संपर्क साधतात. आजी-माजी आमदार, मंत्री सगळ्यांना फोन करतात. निवडणुकीत आपण कितीही चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न केला तरी हे बारकावे निश्चितच लक्षात ठेवले पाहिजेत. समविचारी मतांची विभागणी झाली तर अडचणी येते”, असं अजित पवार म्हणाले.