पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा राष्ट्रवादीला धक्का, ९१ जणांचा काँग्रेस प्रवेश
आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रवेश करण्याऱ्यांमध्ये बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे.
विनय जगताप, भोर, पुणे : महाविकास आघाडीतील घटक पक्षात कुरघोडी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे आऊट गोईंग राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. परिणामी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे. यापुर्वी १५ दिवसांपुर्वी माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गटातील असंख्य पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
पुण्याच्या भोर तालुक्यात भावेखल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रवेश करण्याऱ्यांमध्ये बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे.
जिल्हा परिषदेत फटका बसणार
राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये झालेला हा प्रवेश सोहळा स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये झालेलं हे इनकमिंग पक्षाच बळ वाढवणारं ठरणार आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी जोरदार तयारी केल्याचे पहायला मिळतंय. महाविकास आघाडी या निवडणुका एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीला दुसरा धक्का
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतल अनेक कार्यकर्त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता भोर तालुक्यातून राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
काही दिवसांंपुर्वी करमाळा विधानसभेचे माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार,दौंड मधील धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पांडुरंग मेरगळ विजय मदने सहकार सेना जिल्हा संघटक सोलापूर , आंनद यादव,सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते अरविंद बगाडे, अंकुश घनवट, डॉ. विशाल खळदकर, अशोक फडतरे, सोमनाथ माकर, दीपक भांडवळकर यांच्यासह इतरांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.