Special Report : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत असताना सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर त्यांच्या नकळत खाली आला. त्यामुळे साडीने लगेच पेट घेतला.
पुणे : पुण्यात एका कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. यात सुदैवानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे अनर्थ टळला. यात नेमकं काय घडलं हे आपण रिपोर्टद्वारे जाणून घेणार आहोत.
पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला होता. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मूर्तीसमोरच समई पेटवलेली होती.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करत असताना सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर त्यांच्या नकळत खाली आला. त्यामुळे साडीने लगेच पेट घेतला. पुतळ्याला हार घालणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सुप्रिया सुळे यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या साडीच्या पदराचा काही भाग जळाला . या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली आणि सर्वच जण घाबरून गेले.
सुप्रिया सुळे यांनी मानले आभार
दरम्यान या सर्व प्रकारानंतर अनेकांनी सुप्रिया सुळे यांची आस्थेने चौकशी केली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत विनंती केली. “सर्वांना माझी विनंती आहे, की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणही काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद”, असं ट्विटही सुप्रिया सुळे यांनी केलं.