महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा रणसंग्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकलं, घडामोडींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता लांबचा विचार करत आहे. त्यामुळे पक्षात सध्याच्या घडीला हालचालींना वेग आला आहे.
पुणे : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या आणि जलद गतीने घडामोडी घडत आहेत. राज्यात सत्तांतर होऊन तीन महिने होऊन गेले आहेत. पण अद्याप मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. या दरम्यान आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. राज्य सरकारकडून आता त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी मध्यस्थी केल्याच्या देखील बातम्या समोर आल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये धुसफूस असल्याच्या देखील काही बातम्या समोर आल्या आहेत. सत्ताधारी पक्षामध्ये विविध घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता लांबचा विचार करत आहे. त्यामुळे आगामी महापालिका, नरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शड्डू ठोकला आहे. आता आगामी निवडणुका जिंकून दाखवायच्याच असा निर्धार पक्षाच्या वरिष्ठांनी केलाय. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी नगरपालिका, महापालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पक्षाच्या बूथ बांधणीचा आढावा घेतला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पक्ष संघटना मजबूत करा, पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे आदेश सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे विधी मंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारही कामाला लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पुढे भाजपचं कडवं आव्हान
राज्यात सध्या भाजप पक्ष आमदारांच्या एकूण संख्येच्या बाबतीत एक नंबरचा पक्ष आहे. आपला पक्ष राज्यात आणखी मजबूत व्हावा यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत प्रादेशिक पक्ष आहे. शिवसेनेत मोठं खिंडार पडल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राज्यातील मोठा प्रादेशिक पक्ष या दृष्टीकोनाने पाहिलं जात आहे. पण भाजपकडून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील धक्का देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातच भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आगामी काळात भाजपचं मोठं आव्हान उभं होऊ शकतं. अशा प्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला कसा सामोरं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.