बारामतीत नाट्यमय घडामोडी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, जोरदार घोषणाबाजी
बारामतीत आज चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना बारामतीतून तुम्हीच निवडणूक लढवा, अशी विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत अजित पवारांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बारामतीमधून तुम्हीच लढा. बारामतीमधील आमच्या मनातील उमेदवार तुम्हीच आहात, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. अजित दादा तुम्ही आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, असा हट्ट कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते जमलेले बघायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या आक्रमकपणामुळे अजित पवार गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी आज बारामतीत ठिय्या मांडला. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची गाडी अडवत बारामतीमधून तुम्हीच निवडणूक लढवा, असं सांगत त्यांची गाडी अडवली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना गाडीबाहेर येण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवार गाडीच्या बाहेर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. “तुमच्या मनातला उमेदवार मी देईन”, असं आश्वासन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं.
अजित पवार यांनी आश्वासन दिल्यानंतरही कार्यकर्ते आक्रमक झाले. दादा आजच उमेदवार जाहीर करा. बारामतीमधून तुम्हीच निवडणूक लढवा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी बराच वेळ कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत अजित पवारांचा ताफा अडवला. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत अजित पवार यांच्या गाडीसाठी रस्ता मोकळा करुन दिला.
अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार नाहीत?
अजित पवार यांनी बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तरीही जनतेच्या मनातील उमेदवार देणार, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र, अजित पवारांनी बारामतीमधूनच लढावं यासाठी आग्रही आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून लीड मिळालं होतं. त्यानंतर अजित पवारांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिले होते. “मी इथून तीनवेळा आमदार होतो, खासदारही होतो, अशावेळेला दुसऱ्याला संधी द्यायला हवी. मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून द्यायचं”, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. पण अजित पवार तुम्ही बारामतीमधूनच निवडणूक लढा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.