‘लांडग्यांच्या कळपातून बाहेर या, जंगलाचा राजा व्हा’, अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या नेत्याची साद
अजित पवार यांच्या गटाने सत्ताधारी पक्षांसोबत हातमिळवणी करुन आता तीन महिन्यांचा काळ लोटत आला आहे. तरीही शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांनी पुन्हा आपल्यासोबत यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेल्या एका ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परत शरद पवार यांच्यासोबत येण्याची साद घेतलीय. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा वाघ असा उल्लेख केलाय. तर सत्ताधारी पक्षांच्या युतीला ‘लांडग्यांची युती’ असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटवर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय.
प्रशांत जगताप यांचं ट्विट काय?
“लांडग्यांच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही, तो अस्वस्थच असतो. पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते”, असं ट्विट प्रशांत जगताप यांनी केलं आहे.
प्रशांत जगताप नेमकं काय म्हणाले?
“अजित दादा पुन्हा आले तर त्यांचं निश्चितच स्वागतच होईल. माझं सकाळचं जे ट्वीट आहे त्याला कालच्या संध्याकाळच्या घडामोडींची पार्श्वभूमी होती. काल सायंकाळी मागच्या तीन महिन्यांपूर्वी जे पलिकडच्या गटात गेलेले जुने सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर एका चहाच्या स्टॉलवर गप्पा रंगल्या. यावेळी त्यांनी गेल्या तीन महिन्यांचा सर्व प्रवास उलगडला”, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
‘आमच्यातल्या प्रत्येकाला आम्ही वाघच समजायचो’
“भाजप,आरएसएस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमच्या लोकांची होणारी गळचेपी, त्याचबरोबर मंत्रिपदं, पालकमंत्रीपदं, फाईलींवर सह्या होण्याचे विषय, अर्थमंत्र्यांचे काढलेले अधिकार या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. आमच्यातल्या प्रत्येकाला आम्ही वाघच समजायचो. ती कुठल्या भूमिकेने त्यांच्यासोबत गेले ते मला माहिती नाही. पण या सगळ्यांची असह्य परिस्थिती पाहता मी आज सकाळी ट्विट केलं”, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
वाघाची उपमा नेमकी कुणाला दिली?
“वाघाने स्वत:च्या जंगलात रुबाबातच राहावं. वाघाला आणि जंगलाला एक वेगळं समीकरण आहे. पण असं असताना जे लांडग्यांच्या कळपात जातात त्यांना जंगलाचा राजा होण्याची संधी नसते. अजित दादांना वाघ म्हणणारच नाही, दादा तर सिंह आहेत. वाघ अनेक असतात. पण सिंह खूप कमी असतात. त्यामुळे माझ्यासारखे जे सहकारी तिकडे गेले आहेत त्यांना मी वाघाची उपमा दिली आहे”, असं स्पष्टीकरण प्रशांत जगताप यांनी दिलं.
‘गेलेले लोक अस्वस्थ’
“एक नक्की आहे, राजा हा सिंहच असतो. अजित दादा परत आले तर आनंदच होईल. काय निर्णय घ्यावा तो दादांचा वैयक्तिक विषय आहे. त्याबाबत सल्ला देणारा मी मोठा नाहीय. पण एक नक्की आहे, भाजप आणि आरएसएसकडून दुसरी कोणतीही अपेक्षा होऊ शकत नाही. गेलेले लोक अस्वस्थ नक्कीच आहेत. अजित पवार यांचा मुक्त वावार, मुक्त छबी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर होती ती तिकडे गेल्यानंतर आम्हाला दिसली नाही ही वस्तुस्थिती आहे”, असं प्रशांत जगताप म्हणाले.