‘निवडणूक आयोगाचा गैरवापर’, शरद पवार यांचं मोठं विधान, थेट स्पष्टच बोलले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल मोठं विधान केलंय. पुण्यातील अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत असताना मोठं विधान केलं.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल मोठं विधान केलंय. पुण्यातील अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत असताना भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असा दावा करण्यात आला. शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेला महत्त्व आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाच दशकांपेक्षाही जास्त काळाचा अनुभव आहे. मराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसोबत त्यांनी एकेकाळी काम केलंय. ते एकेकाळी देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. त्यामुळे त्यांचं विधान महत्त्वाचं मानलं जातं.
शरद पवार यांनी पुण्यात आज भाजपवर निशाणा साधत असताना निवडणूक आयोगाच्या निकालावर भूमिका मांडली. “पुणे शहर एकता ठेवणारं शहर आहे. अल्पसंख्याक समुदाय काँग्रेस,राष्ट्रवादी,समाजवादीसोबत राहिला आहे. देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातोय. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं, निवडणूक आयोगाचा कसा गैरवापर होतोय, शिवसेना एकाच्या हातून काढून दुसऱ्याच्या हाती देण्याचं काम केलं”, अशी टीका शरद पवार यांनी केली.
‘निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे…’
“शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म दिला. त्यांनी पक्षाची बांधणी केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सागितले की, माझ्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील. निवडणूक आयोगाने शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्या हातात नाही दिली. निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितले”, असं शरद पवार म्हणाले.
“शिवसेनेला दुसऱ्याच्या हाती देऊन टाकले. ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांना शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दिले. दिल्लीत देखील लोकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पसंती दिली म्हणून दिल्लीत केंद्र सरकार निवडणुका होऊ देत नाहीत. निवडणूक आयोगाने तीन वेळा निवडणूक लावली. पण दिल्लीने रद्द केली. कारण त्यांना माहिती आहे की, ते राजधानीत हरतील. यातून हेच दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते विरोधी पक्षात काम करु देणार नाही”, असा आरोप त्यांनी केला.
“आता आपल्या सगळ्या लोकांना एकत्र यावं लागेल. कसबा निवडणुक खूप महत्त्वाची आहे. समाजात भाईचारा, एकोपा कसं ठेवायचं ते रवींद्र यांच्याकडे बघून कळतं. कुणी काहीही अफवा पसरवेल. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. निवडणुकीवर लक्ष द्या”, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं.