PMC Water connection : पुढचे काही दिवस मिळणार नाही नवं पाणी कनेक्शन, पुणे महापालिकेचा निर्णय; काय कारण? वाचा सविस्तर
पीएमसी पाणीपुरवठा विभागाने त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना तत्काळ मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शनसाठी परवानग्या थांबवण्याच्या शक्यतेबद्दल कळवले आहे. या महिन्याच्या अखेरीस परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.
पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) मालमत्तांना नवीन पाणी जोडण्यांना परवानगी देणे तात्पुरते थांबवण्याचा विचार करत आहे. 23 गावांच्या विलीनीकरणानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याची कमी झालेली उपलब्धता आणि वाढती मागणी पाहता, महापालिकेने यासंबंधी विचार केला आहे. शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या चार धरणांतील पाणीसाठा नऊ टीएमसीने खाली आला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात 11 टीएमसी होता. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पिण्याच्या गरजांसाठीच पाणी आरक्षित आहे. पाऱ्याची पातळी वाढल्याने आणि शहराच्या हद्दीचा विस्तार यामुळे वापरात वाढ झाल्यामुळे पाण्याची संभाव्य टंचाई (Shortage) अपेक्षित होती, असे नागरी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सध्या पाण्याची टंचाई शहराला जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका विविध स्तरावर उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून हा विचार करण्यात आला आहे.
तापमान वाढ-पाण्याच्या वापरात वाढ
ते पुढे म्हणाले, की पीएमसी पाणीपुरवठा विभागाने त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना तत्काळ मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शनसाठी परवानग्या थांबवण्याच्या शक्यतेबद्दल कळवले आहे. या महिन्याच्या अखेरीस परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल. दरवर्षी, मागणी पूर्ण करण्यासाठी नागरी संस्था 15-20 टक्क्यांनी जास्त पाणी वापरत असल्याने शहरात पाण्याचा वापर वाढतो. यंदा गेल्या महिन्यापासून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने शहरात पाण्याचा वापर अधिक होत आहे. सध्याची गरज पूर्ण करण्यासाठी पीएमसीला 1,600-1,700 एमएलडी पाणी खेचावे लागेल जे मागील वर्षी 1,250-1,300 एमएलडी होते.
पुरवावे लागतेय प्रक्रिया केलेले पाणी
पुणे महापालिका आतापर्यंत जलकुंभातून थेट लगतच्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत होती, परंतु आता शहराच्या नव्याने समाविष्ट झालेल्या भागात नागरिकांना प्रक्रिया केलेले पाणी पुरवावे लागत आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच पीएमसीला नव्याने विलीन झालेल्या गावांतील नागरिकांना पुरेसे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात नेमके काय होणार, हे पाहावे लागणार आहे.