प्रदीप कापसे, इंदापूर, पुणे : राज्यातील राजकारणात महाविकास आघाडी अन् युती असे दोन समीकरणे तयार झाली आहेत. वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीकडून शिवसेना-भाजप युतीने सत्ता खेचून घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. नुकतीच अजित पवार यांनी आपणास या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी जाहीररित्या केली आहे. दुसरीकडे पुढची विठ्ठलाची शासकीय पूजा अजित पवार करणार आहेत? असा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नावाची तयारी सुरु झाली आहे.
पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. आपण संत तुकोबारायांच्या चरणी अशी प्रार्थना केली असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. मिटकरी यांनी सांगितले की, अजित दादांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही शेवटची विठ्ठलाची पूजा असणार आहे, असा दावा मिटकरी यांनी केला.
अमोल मिटकरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहकुटुंब दाखल झाले आहे. तसेच वारकऱ्यांसोबत काही वेळ ते सहकुटुंब चालणार आहेत. वारकऱ्यांना सेवा पुरवण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. पाऊस नाही आणि उन्हाच्या कडाक्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतोय, असा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्यात चालले असते तर चांगले झाले असते, असे त्यांनी म्हटले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांनी दावा केला होतो. ते म्हणाले होते की, मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाची सदस्य संख्या कमी झाली. महाविकास आघाडीत ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही पाठिंबा दिला होता. परंतु अमोल मिटकरी यांच्या मागणीवर काँग्रेसकडून टीका झाली होती.