प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ विधानाने महाविकास आघाडीला टेन्शन; नेत्यांची सारवासारव काय?
प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. महाविकास आघाडीशी आपली युती झाली नाही. त्यामुळे कुणीही महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नये. कुणीही त्यांच्या कार्यक्रमात हजर राहू नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. आंबेडकर यांच्या या विधानानंतर आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे | 3 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे. या जागा वाटपाचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या कार्यक्रमांना, बैठकांना जाऊ नये असं आवाहन केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आंबेडकर यांच्या या विधानाने आघाडीचं टेन्शन वाढलं असून आता आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून हे आवाहन केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत कोणीही आघाडीच्या बैठका आणि कार्यक्रमाला हजर राहू नये, असं वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी म्हटलं आहे.
चुकीच्या अर्थाने पाहू नका
प्रकाश आंबेडकर यांच्या या आवाहनानंतर महाविकास आघाडीचे नेते खडबडून जागे झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंबेडकरांचे वक्तव्य मी ऐकलं. प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे त्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याकडे चुकीच्या अर्थाने पाहू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. आमच्या पक्षातील लोकांना आणि इतर कोणालाही आदेशाची गरज नाही. राजकीय निर्णय होत असतात, जेव्हा होतील तेव्हा होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
ही शेवटची निवडणूक असेल
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत जावं ही आंबेडकरी विचारांची नागरिकांची भूमिका आहे. अपेक्षा आणि भावना असून प्रकाश आंबेडकर राज्यातील गावागावात जात आहेत. त्यांना लोकं साथ देत आहेत. या निवडणुकीत परिवर्तन झालं नाही तर देशातली ही शेवटची निवडणूक असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तिढा 6 तारखेपर्यंत सुटेल
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आंबेडकरांच्या आवाहनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमची चर्चा झाली आहे. दोन दिवसात तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील. पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेलेला दिसेल असं मला वाटतं, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
आंबेडकरांची राज्यात ताकद
मंत्री दीपक केसरकर यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात ताकद आहे. त्यांच्या पक्षाला दिलेली वागणूक शोभादायक नाही. आंबेडकर नेहमीच आपल्या तत्त्वासाठी लढत असतात. त्यानी काय निर्णय घ्यावा, कोणत्या आघाडीसोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.