शरद पवार यांचे एक घाव दोन तुकडे, अजितदादांचे परतीचे दोर कापले; काय म्हणाले शरद पवार?
अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी केलं. या विधानाला अवघे पाच तास होत नाही तोच शरद पवार यांनी यूटर्न घेतला आहे.
सातारा | 25 ऑगस्ट 2023 : अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी केलं. या विधानाला अवघे पाच तास होत नाही तोच शरद पवार यांनी यूटर्न घेतला आहे. अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान मी केलंच नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र, पक्षात फूट पडलेली नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवार यांच्या घूमजाव करण्यामागचं कारण काय? शरद पवार हे संभ्रम निर्माण करत आहेत का? राष्ट्रवादीची नेमकी खेळी काय आहे? असा सवाल या निमित्ताने केलं जात आहे. तसेच अजित पवार यांना पक्षात पुन्हा संधी नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट करून एक घाव दोन तुकडे केले आहेत.
अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा संधी देणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर एकदा एखादी भूमिका घेतली असेल करेक्शन केली असेल, तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना संधी दिली होती, असं सांगतााच पण संधी मागायची नसते. संधी द्यायची नसते. आमची हीच भूमिका आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांना आता राष्ट्रवादीतील परतीचे दोर कायमचे कापले गेले असल्याचं सांगितलं जात आहे.
सुप्रिया म्हणू शकते, मी नाही
शरद पवार यांनी सकाळी बारामतीत अजित पवार आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असं म्हटलं होतं. पण अवघ्या पाच तासात पवार यांनी घुमजाव केलं आहे. अजित पवार आमचे नेते असं मी म्हटलं नाही. सुप्रिया असं म्हणू शकते. मी नाही, असं शरद पवार म्हणाले.
म्हणून निवडणूक आयोगात गेलो
पक्षात फूट पडली नाही असं तुम्ही म्हणता मग निवडणूक आयोगाकडे तुम्ही का गेलात? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, आम्ही कारवाईची मागणी केली. तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही काही चुकीची भूमिका घेतली आणि मी तुमच्यावर कारवाई केली याचा अर्थ ती पक्षातील फूट नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं,
अजितदादांची पहिली प्रतिक्रिया
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर मला तुम्ही या प्रश्नावर विचारू नका. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. मला तुम्ही विकासाबाबत विचारा. त्यावरच मी बोलेल, असं अजित पवार म्हणाले.