आघाडीत जुंपली! ईव्हीएमवरून अजितदादांनी संजय राऊत यांना तोंडघशी पाडलं; विरोधक कुठे कुठे जिंकले… यादीच दिली
मला काल पित्ताचा त्रास होत होता. मी जिजाईला गेलो. डॉक्टरांकडून उपचार घेतले. आराम केला. तुम्ही आधी कन्फर्म केल्याशिवाय एखाद्याची बदनामी करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
पुणे : निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर असावा की नसावा? यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बांगलादेशाने ईव्हीएमच्या वापरावर बंदी घातल्यानंतर ठाकरे गटाकडून देशातही ईव्हीएमच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, आता ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच जुंपल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विजयाचं रहस्य ईव्हीएम मशीनमध्ये आहे म्हणताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ईव्हीएमद्वारेच कोणत्या कोणत्या राज्यात विरोधकांची सत्ता आली याची यादीच वाचून दाखवली. अजित पवार यांनी जाहीरपणे ही यादी वाचून दाखवत संजय राऊत यांना तोंडघशी पाडलं आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आघाडीतच बेबनाव असल्याचं उघड झालं आहे.
अजित पवार यांना ईव्हीएमबाबत विचारलं असता त्यांनी आपली सडेतोड मते मांडली. ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. जर ईव्हीएमला दोष दिला असता तर दिल्लीत आप आलं नसतं. पंजाबमध्ये आप आलं नसतं. तेलंगनात चंद्रशेखर राव आले नसते. जगनमोहन रेड्डी आंध्रात आले नसते. राजस्थानात काँग्रेस आली नसती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आल्या नसत्या. पराभव झाला तर ईव्हीएमला दोष द्यायचा आणि विजय झाला तर सर्व अलबेल आहे असं म्हणायचं हे बरोबर नाही, असा टोला अजित पवार यांनी राऊत यांना लगावला.
मी ज्योतिषी नाही
निवडणुकीचा अंदाज सांगणारा मी कुणी ज्योतिषी नाही. लोकांच्या समोर जाण्यासाठी निवडणुकीची रणनीती असते. कोण कुठलं बटण दाबणार आहे हे अॅक्युरेट सांगणारा अजून जन्माला येणार आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत यांनी ईव्हीएमला विरोध केला होता. शरद पवारांकडे विरोधी पक्षांची 15 दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमवर आक्षेप घेतला गेला. ईव्हीएमद्वारे घोटाळे कसे होतात यावर चर्चा झाली. भाजपच्या विजयाचं रहस्य ईव्हीएममध्ये कसं दडलं आहे हे सर्वांनी मान्य केलं. आज बांगलादेशात विरोधी पक्षाच्या मागणीवरून ईव्हीएम रद्द केलं. ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. विरोधकांनी आक्षेप घेताच तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी ईव्हीएम रद्द केल्या. हे आपल्या राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते.
देशमुख संपर्कात नाही
काँग्रेस नेते आशिष देशमुख राष्ट्रवादीत येणार असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीचा मेळावा ते विदर्भात घेणार असल्याचंही सांगितलं जातंय. त्यावर अजित पवार यांना विचारण्यात आलं. आशिष देशमुख आमच्या संपर्कात नाहीत. माझी आणि त्यांची चर्चा झाली नाही. मीडियातून मी या चर्चा ऐकतोय, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.