पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही, फक्त 376 ऑक्सिजन बेड शिल्लक
व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. | Pune Coronavirus
पुणे: मुंबईपाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्था तोकडा पडताना दिसत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुण्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. (Coronavirus updates in Pune)
पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाकडून लष्कराची मदत मागण्यात आली आहे. पुण्याच्या लष्करी रुग्णालयातील बेडस् उपचारासाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, लष्कराने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. हे बेडस उपलब्ध झाले तरी त्यांची संख्या 450 इतकीच आहे. त्यामुळे पुण्यात आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे.
If surge in new cases continues, we could have a dearth of ventilator beds. Have written to Maharashtra Health Minister Rajesh Tope & Union Minister Prakash Javadekar requesting transfer of ventilators beds from states where #COVID19 is under control: M Mohol, Pune Mayor (07.04) pic.twitter.com/oNAMpGLP8K
— ANI (@ANI) April 8, 2021
पुण्यातील कोरोना स्थिती?
पुण्यात बुधवारी दिवसभरात 5 हजार 651 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 4 हजार 361 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 13 जण हे पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 4 लाख 60 हजार 71 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 957 जणांची कोरोना स्थिती चिंताजनक आहे. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी: मुंबईत कोरोनाचा उद्रेक, एकाच इमारतीत 22 रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची भीती
कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान
(Coronavirus updates in Pune)