‘मराठा समाजाचं अस्तित्व उरणार नाही’, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचं भाकीत
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या नव्या आध्यदेशावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं तर मराठा जातच राज्यात शिल्लक राहणार नाही, असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला.
अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 27 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे. महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे लाखो मराठा बांधवांना आता कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांनाच ओबोसी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयऱ्यांनादेखील प्रतिज्ञापत्रांच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारने याबाबत थेट आदेशच काढला आहे. पण सरकारच्या या निर्णयाला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी विरोध केला आहे. या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजाचं अस्तित्वच शिल्लक राहणार नाही, असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.
“आता ओबीसी आरक्षणाचं वर्गीकरण आणि विभाजन होईल. जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा 96 कुळी मराठा म्हणून घेऊ शकत नाहीत. कुणबी दाखल झाला की राज्यातील मराठा समाजाच्या जमातीचे अस्तित्व संपुष्टातील राज्यात मराठा समाज उरणार नाही. आता कुणबी की तू का मेळवावा असं करावं लागेल”, असा मोठा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला.
‘हे आरक्षण न्यायालयात टीकणार नाही’
“या मसुद्यामुळे सर्व आरक्षणाचा खेळखंडोबा होईल. सगळे या मसुद्याला विरोध करतील. आम्ही 3 कोटी सूचना सरकारला पाठवू, तसा ड्राफ्ट आम्ही तयार करू. सरकार मसुदा तयार करू शकत नाही. आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालयात हे टीकणार नाही. आरक्षणाच्या ढाच्यायाला हात घातला. न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. शपथपत्र, सगेसोयरे, गणगोत असं जातीचे वर्गीकरण होऊ शकत नाही. हे घटनेत बसत नाही. हा घटनेशी धोका आहे. राज्य सारकला सत्तेत राहण्याचा आधिकार नाही. आम्ही राज्यपालांना भेटणार आमच गाऱ्हाणं मांडणार, राज्य सरकारने आमची फसवणूक केली. त्यांना सत्तेततून हाकला अशी मागणी राज्यपालांना करणार”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
‘आम्ही भुजबळांची ढाल बनू’
“मंत्री छगन भुजबळ आमची बाजू लढत आहेत. त्यांना सरकारमध्ये पण साथ मिळत नाही. आम्ही भुजबळांची ढाल बनू. भुजबळ आमची बाजू मांडत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही गप्प, तुमची भूमिका स्पष्ट करा. आम्ही त्यांना लवकरच भेटणार. सर्व ओबीसी नेते देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी भेटणार. त्यांच्याजवळ भूमिका स्पष्ट करू”, असं प्रकाश शेंडगे यांनी सांगतिलं. यावेळी प्रकाश शेंडगे यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी जे कोणी येतील त्या सगळ्यांना आम्ही बोलवू. आम्ही कोणालाच विरोध करणार नाही”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
यावेळी प्रकाश शेंडगे यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अनेक नेत्यांच्या अनेक पक्षीय भूमिका आहेत. त्या भूमिका सांभाळून त्यांना हे सगळं करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या पक्षाने दुसऱ्या नेत्यांना ओबीसी मिळण्यासाठी पाठवलं होतं म्हणून कदाचित त्या नसाव्यात. आम्ही फोर्स करू शकत नाही. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांना माहीत. आम्ही विनंती करू शकतो की पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजासाठी एकत्रित या”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
‘धनगर समाजाचा प्रश्न वेगळा’
“धनगर समाजाच्या एसटी समावेश करण्याचा प्रश्न वेगळा आहे. धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये केलेला आहे हे आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. काही शब्द चुकल्यामुळे या अडचणी येत आहेत. पण त्या अडचणी लवकरच दूर होतील. धनगर ऐवजी धनगड झाल्याने हा सगळा घोळ झालाय. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. याबाबत परिपत्रक काढावं लागेल. आमची मागणी आहे की धनगर जात समावेश करून घ्या”, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.