पुणेकरांना झटका, प्रवास महागला, आता जादा पैसे मोजावे लागणार

| Updated on: Jan 04, 2024 | 8:56 AM

Pune News | पुणे शहारात ओलो- उबेर टॅक्सीमधून प्रवास महाग झाला आहे. परंतु काळी पिवळी टॅक्सीबाबत दिलासा मिळाला आहे. तसेच प्राधिकारणाच्या बैठकीत प्रवाशांच्या हितासाठी नवीन नियम तयार करण्यात आले. त्यानुसार शहरी भागांत प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना सक्तीचा करण्यात आला आहे.

पुणेकरांना झटका, प्रवास महागला, आता जादा पैसे मोजावे लागणार
Follow us on

पुणे, दि. 4 जानेवारी 2024 | पुणे शहरात प्रवास महाग झाला आहे. आता पुणेकरांना पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत जादा पैसे मोजावे लागणार आहे. पुणे शहरात आता ओला, उबरमधून प्रवास महागला आहे. जिल्हाधिकारींच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानाच्या बैठकीत वातानुकूलित टॅक्सीच्या भाडे वाढीला मंजुरी देण्यात आली. वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. त्यानंतर आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये लागणार आहेत तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दर द्यावे लागणार आहे. एक जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काळ्या पिवळ्या टॅक्सीचे दर जैसे थे आहे.

काळी पिवळी टॅक्सीच्या दरात वाढ नाही

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली होती. या बैठकीत दरवाढीला मंजुरी देण्यात आली. यामुळे हे नवीन दर आता लागू करण्यात आले आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर मागील वर्षी १७ एप्रिलला पहिल्या दीड किलोमीटरला ३१ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरला २१ रुपये करण्यात आला होता. त्या वेळी सीएनजीचा दर हा ८६ रुपये किलो होता. सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सीचा एप्रिलमधील दर बदलण्यात आलेला नाही. खटुआ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा वातानुकूलित कॅबला २० टक्के दरवाढ करण्याची शिफारस केलेली आहे. या शिफारशीनुसार वातानुकूलित टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

ओला-उबेरच्या मक्तदारीस लगाम ?

प्राधिकारणाच्या बैठकीत प्रवाशांच्या हितासाठी नवीन नियम तयार करण्यात आले. त्यानुसार शहरी भागांत प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच प्रवाश्यांकडून भाडे घेताना ते प्रमाणित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे ओला-उबेरकडून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची लूट होते. त्याला लगाम बसणार आहे.