पुणेकरांनो वाहतुकीतील हा बदल पाहून घराबाहेर पडा, पालख्यांमुळे असणार बदल
pune palkhi 2023 route : संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे शहरात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे.
पुणे : पुणे शहरातील वाहतूक मार्गात बदल होणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात येणाऱ्या पालख्यांमुळे वाहतूक मार्गात बदल केला जाणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी पुण्यात येणार आहे. यानिमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवणार आहे. पालखी सोबत येणाऱ्या वारेकऱ्यांची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. यावेळी तंत्रज्ञानाचा वापर पालख्यांसाठी करण्यात येणार आहे.
वाहतुकीत केला बदल
संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येणार आहे. पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी घातली गेली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी १०० कर्मचारी राहणार तैनात करण्यात आले आहे.
पालखीचे मिळणार ‘लाइव्ह लोकेशन’
पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामुले पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार आहे. पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप तसेच सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावरील मेट्रोची कामे बंद ठेवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी एका दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं निर्णय देवस्थान प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
डाव्या बाजूने चालावे
प्रत्येक पालखी तळावर पोलीस मदत केंद्र (Police Help Center) असणार आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. उजव्या मार्गाने वारीतील वाहने जातील. स्टॉलधारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूला लावावेत. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी दर्शनासाठी स्त्री आणि पुरूष यांच्यासाठी वेगळी रांग असेल. प्रत्येकाने रांगेतूनच दर्शनासाठी जावे. या काळात काही संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंद्रायणी नदीत केमिकल सोडले
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चार दिवसांवर आली असताना वारीतील वारकऱ्यांचा आरोग्य धोक्यात आणण्याचा हा प्रकार सुरु आहे. केमिकल सोडल्याने इंद्रायणी नदीचे पात्र पुन्हा एकदा फेसाळ्याचे पाहायला मिळत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १२ जूनला होत आहे. परंतु नदीत स्नान केल्यानंतर वारेकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.