सागर सुरवसे, सोलापूर, दि. 25 नोव्हेंबर 2023 | कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु हाच कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतो. परंतु कांदा नगदी पीक असल्यामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचवेळी कांद्याचे दर घसरले आहे. महिन्याभरात कांदा अर्ध्या किमतीवर आले आहे. नाशिक जिल्ह्याप्रमाणे सोलपूर जिल्ह्यांत कांद्याचे दर घसरले आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. सोलापुरात शनिवारी जवळपास साडेपाचशे गाडी कांद्याची आवक झाली आहे.
सोलापुरात चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात हे दर निम्म्यावर आले आहे. मागील महिन्यात कांद्याला 60 ते 70 रुपये भाव होता. एका आठवड्यात जवळपास 3 हजार गाडी कांद्याची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवाळी निमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 12 दिवस बंद होत्या. त्यानंतर मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाला. कांद्याच्या भावात घसरण सुरु झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 3200 ते 3500 इतका भाव मिळत होता. त्यात क्विंटल मागे 300 ते 800 रुपये घसरण झाली आहे. 6 नोव्हेंबर रोजी कांद्याला जास्तीतजास्त 4 हजार रुपये दर होता. आता कांद्याला प्रति क्विंटल 2600 ते 3200 इतका भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लासलगाव बाजार समितीचे उपबाजार विंचूर आहे. या बाजार समितीने गेल्या चार महिन्यात कांदा लिलावात आघाडी घेतली आहे. विंचूरमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील पंधरा दिवसांत 6 लाख 97 हजार क्विंटलची कांदा विक्रीसाठी दाखल झाला. आता येत्या काही दिवसांत अधिक कांद्याचे लिलाव करण्यावर भर दिला आहे.