७० किमी प्रवास करुन पाच क्विंटल कांदा विकला, शेतकऱ्याला मिळाले २ रुपये, चेक पाहून रडूच कोसळले
५१२ किलो कांदा ७० किलोमीटर प्रवास करुन विकायला आणला. बाजार समितीत त्यासाठी ५१२ रुपये मिळाले. परंतु तोलाई, हमाली असा बाजार समितीमधील खर्च वजा करुन शेवटी २ रुपयांचा चेक त्याला मिळाला.
सोलापूर : शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. त्यासाठी अनेक सरकारे आली अन् गेली. परंतु बळीराजाची व्यथा कोणी दूर करु शकला नाही. आश्वासन आणि निवडणूक घोषणांशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या मालास भाव मिळवून देणारे सरकार पाहिजे. परंतु अजूनही ते स्वप्न आहे. सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांने दोन एकर शेतात कांदा लावला. त्यातील ५१२ किलो कांदा ७० किलोमीटर प्रवास करुन विकायला आणला. बाजार समितीत त्यासाठी त्यांना ५१२ रुपये मिळाले. परंतु तोलाई, हमाली असा बाजार समितीमधील खर्च वजा करुन शेवटी २ रुपयांचा चेक त्याला मिळाला. मग हा चेक पाहून त्या बळीराज्यास रुडूच कोसळले.
चेक मिळाला अन् रडू कोसळले
सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव येथील शेतकऱ्याची ही व्यथा आहे. राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने १७ फेब्रुवारी रोजी ५१२ किलो कांदा विकण्यासाठी बाजार समितीत आणला. ५१२ किलो कांद्यासाठी त्यांना ५१२ रुपये मिळाले. त्यातून हमाली ४०.४५, तोलाई २४.०६, भाडा १५ रुपये, रोख उचल ४३० रुपये असे एकूण ५०९ रुपये ५१ पैसै वजा करण्यात आले. त्यानंतर त्यांना २ रुपये ४९ पैशांचा चेक देण्यात आला. या चेकवरही तारीख ८ मार्च २०२३ दिली आहे. दोन रुपयांचा हा चेक पाहून राजेंद्र चव्हाण यांना रडूच कोसळले.
कांदा दरात घसरण
बांगलादेश आणि श्रीलंकेत होणारी कांद्याची निर्यात थांबली आहे. तसेच देशात इतर ठिकाणी कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाले. प्रथमच कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलवर आले आहेत. दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर आली.
चार वर्षांचा नीचांक
महाराष्ट्रात कांद्याचे दरात गेल्या चार वर्षांतील नीचांक आहे. मागील तीन वर्षे कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता. जानेवारीत लासलगाव बाजारात ११ लाख ६२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी १३९२ रुपये प्रति क्विंटलचा दर कांद्याला मिळाला होता. परंतु फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर अधिकच घसरले आहेत.