पुणे : पुणे शहरात प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली सध्या चर्चेत आले आहे. नेहमी खवय्यांच्या पसंतीला उतरलेल्या हॉटेल वैशालीची चर्चा सध्या वेगळ्याच कारणाने होत आहे. हे हॉटेल बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाला आहे. या हॉटेलवर मालकी कोणाची? हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाच्या मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणेकरांना दाक्षिणात्य पाककृतींची ओळख करून या हॉटेलच्या माध्यमातून झाली होती. हे हॉटेल सुरु करणारे जगन्नाथ शेट्टी यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले.
हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवरच बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतल्याचा आरोप केला आहे. या माध्यमातून त्याने हे हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे देखील तिने म्हटले आहे. एवढेच नाही तर लग्नाआधी पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा आरोप केला आहे. यामुळे पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
हॉटेल मालकाच्या मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) यांच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी पतीने पीडित महिलेला २०१८ मध्ये घोले रोड येथील राहत्या घरी नेले. या ठिकाणी मद्य अन् ड्रग्ज देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर लिहून घेतली. तसेच तिच्या नावावर खरेदी केलेल्या ५२ कोटी ५० लाखांच्या ४ महागड्या कार परस्पर विकल्या. तिचे १ कोटी ७० लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्याचा भाऊ वापरत आहे. महिलेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जगन्नाथ शेट्टी 1949 मध्ये पुण्यात आले. त्यांनी 1951 मध्ये पुणे शहरात रुपाली, वैशाली आणि आम्रपाली हे हॉटेल्स सुरु केले. पुणे शहरातील त्रिदल संस्थेने जगन्नाथ शेट्टी यांना “पुण्यभूषण पुरस्कार” देऊन गौरव केला. दक्षिण भारतीय पदार्थांच्या गुणवत्तेमुळे हे हॉटेलचे अल्पवधीतच लोकप्रिय झाले. शरद पवार, राज ठाकरे आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद घेतला आहे.