Pune rain : मावळातल्या पावसामुळे पवना धरणातल्या पाणीसाठ्याचं अर्धशतक! लोणावळ्यातही सलग चौथ्या दिवशी मुसळधार..!

| Updated on: Jul 15, 2022 | 2:50 PM

पाऊस जोरदार सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढला असून वाढत्या पाणीपातळीमुळे त्याचा विसर्ग करावा लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहणाच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

Pune rain : मावळातल्या पावसामुळे पवना धरणातल्या पाणीसाठ्याचं अर्धशतक! लोणावळ्यातही सलग चौथ्या दिवशी मुसळधार..!
पवना धरणातली वाढलेली पाण्याची पातळी
Image Credit source: tv9
Follow us on

मावळ, पुणे : मावळात सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरण (Pawna dam) 55.25 टक्के भरले. धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या 24 तासांत 75 मीलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे 24 तासांत पाणीसाठ्यात 4.28 टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. 1 जूनपासून 1274 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तर दिवसभरात 75 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पाणीसाठ्यात (Water storage) अर्धशतक पूर्ण झाले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा 55.25 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 33.62 टक्के इतका होता. यंदा मात्र कितीतरी अधिक प्रमाणात यात वाढ झाल्याचे दिसत आहे. लोणावळा परिसरातदेखील मुसळधार पाऊस होत आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा आधीच वेधशाळेने वर्तवला आहे.

सलग चौथ्या दिवशी लोणावळ्यात पाऊस

पाऊस जोरदार सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढला असून वाढत्या पाणीपातळीमुळे त्याचा विसर्ग करावा लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहणाच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. तिकडे लोणावळा परिसरात पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळाला. सलग चौथ्या दिवशी इथे दोनशे मिलिमीटरहून अधिकचा पाऊस बरसला आहे. गेल्या चोवीस तासांत 227 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर चार दिवसांत 890 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. आत्तापर्यंत 2196 मिलिमीटर पाऊस झाला आहे, जो गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत अवघा 1374 मिलिमीटर इतकाच झाला होता.

सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यातच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर सध्या जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. पुण्यातील मुठा नदीही भरून वाहत आहे. कारण धरणे भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काहीशी उसंत पावसाने घेतली असली, तरी आगामी काळात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, प्रवास करायचा असेल तर घाट माथ्याच्या परिसरातून जाणे टाळावे, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. खबरदारी म्हणून अनेक पर्यटनस्थळे काही काळासाठी बंदही ठेवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पवनातील पाणीसाठा वाढला – व्हिडिओ