भाजपची गळती थांबेना, पिंपरी चिंचवडमधील बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांचा राजीनामा, पुढचा निर्णय काय?
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप घडवणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) भाजपला (BJP) एका मागून एक धक्के बसत आहेत
पुणे : राज्यात येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप घडवणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) भाजपला (BJP) एका मागून एक धक्के बसत आहेत. भाजप नगरसेवक पक्षाचा राजीनामा देत आहेत. आज पिंपरी चिंचवडमधील बिनविरोध निवडून आलेल्या रवी लांडगे (Ravi Landge) यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भोसरी गावचे नगरसेवक रवी लांडगे यांनी भाजप च्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी भाजप चे नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामठे आणि माया बारणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला लागलेली गळती थांबत नसल्याचं चित्र आहे.
भाजपचे बिनविरोध नगरसेवक ते राजीनामा
रवी लांडगे हे गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज असून त्यांची नाराजी त्यांनी अनेकदा जाहीर व्यक्त केली आहे. ते स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते मात्र ते पद त्यांना मिळालं नाही. तसेच पक्षांतर्गत रोषाला सामोरे जावे लागले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये ते भोसरी गावामधून बिनविरोध निवडून गेले होते. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झालीय.
माया बारणे यांचा कालचं राजीनामा
पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी कालच पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपमधील भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी स्पष्ट केलं आहे. नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे ह्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे माया बारणे ह्यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता राजकीय या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
तुषार कामठे यांनी राजीनामा का दिला?
भाजपचे पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील नगरसेवक पदाचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फलक लावून कामठे यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर स्थानिक राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
इतर बातम्या:
Video : साताऱ्यातला ‘तो’ पाऊस आणि ‘ती’ निवडणूक; शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांचं तोंडभरून कौतुक