तुमच्या गाडीचा नंबर MH14 आहे का? ‘या’ टोलनाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार
टोल हटाव संघर्ष समितीकडून रविवारी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. (MH14 Vehicles Somatane varsoli toll naka)
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वाहनचालकांना दोन टोलनाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे आणि लोणावळ्यातील वरसोली टोलनाक्यावर मावळवासियांना संपूर्ण टोलमाफी देण्यात आली आहे. MH-14 पासिंग असलेल्या वाहनांना या टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून टोलमाफीची मागणी करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलसा मिळाला आहे. (Pimpari Chinchwad MH14 Passing Vehicles to get Toll exemption on Somatane and varsoli toll naka)
MH-14 पासिंग वाहनांना तूर्तास टोलमाफी
पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाचा संकेतांक MH-14 आहे. सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावर टोलमाफी देण्याची दीर्घ काळापासून स्थानिक मागणी करण्यात येत होती. अखेर टोल हटाव संघर्ष समितीच्या मागणीला एमएसआरडीसी आणि आयआरबीकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. तूर्तास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे आणि लोणावळ्यातील वरसोली टोलनाक्यावर MH-14 पासिंग असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. त्यामुळे टोल हटाव संघर्ष समितीकडून रविवारी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
मावळवासियांची तक्रार काय
सोमाटणे फाटा येथील टोलनाका अनधिकृत असून टोल आकारणी करुन मावळवासियांची लूट होत असल्याची तक्रार करत सर्वपक्षीय कृती समितीने आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रविवारी मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही टोल हटाव संघर्ष समितीकडून देण्यात आला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यातर्फे संबंधितांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चा घडवण्यासाठी बैठक
टोल हटाव संघर्ष समिती प्रमुख किशोर आवारे, सुरेश चौधरी, सचिन भंडलकर, गणेश खांडगे, अमोल शेटे, सुनील पवार यांच्यासह आयआरबीचे वामन राठोड एमएसआरडीसीचे वाहतूक नियमन अधिकारी दिलीप शंकरराव सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक, पाटील आणि सर्वपक्षीय पदाधिकारी या बेठकीला उपस्थित होते.
स्थानिक राज ठाकरेंच्या भेटीला
तळेगावच्या सोमाटणे भागातील विविध पक्षांचे प्रतिनिधी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी गेले होते. सोमाटण्यातील टोलनाका बंद करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि एका दिवसात माहिती देण्यास सांगितले होते. (Pimpari Chinchwad MH14 Passing Vehicles to get Toll exemption on Somatane and varsoli toll naka)
गेली 15 वर्ष सोमाटणे भागातील स्थानिक रहिवाशी टोलनाका बंद करण्याची मागणी करत आहेत. पण कंत्राट 11 वर्षांसाठी दिल्याचं सांगत प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप आहे. कोरोना काळात पुन्हा एकदा नवे कंत्राट देण्यात आले आणि ते आयआरबीने जिंकले. त्यामुळे हा टोलनाका बंद करा या मागणीसाठी नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
संबंधित बातम्या :
VIDEO | फास्टॅगवरुन मनसे नेत्या रुपाली पाटील यांची किणी टोल नाक्यावर वादावादी
वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर
तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध, स्थानिक ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंचा म्हैसकरांना फोन
(Pimpari Chinchwad MH14 Passing Vehicles to get Toll exemption on Somatane and varsoli toll naka)