पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले
पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी उद्धव ठाकरे यांना दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर सचिन भोसले आणि जिल्हाध्यक्ष गौतम चाबुकस्वार यांनी पक्षातील आठ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले.
पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवडचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) उमेदवार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे ( Nana Kate ) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राहुल कलाटे ( Rahul Kalate ) यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी नाना काटे यांच्यांसाठी प्रचार करण्याचा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला आहे. परंतु हा निर्णय काही पदाधिकाऱ्यांना रुचला नाही.
काय घेतला निर्णय
महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचे काही पदाधिकारी प्रचार करत आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर सचिन भोसले आणि जिल्हाध्यक्ष गौतम चाबुकस्वार यांनी पक्षातील आठ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले.
ठाकरे गटाच्या महिला संघटक अनिता तुतारे यांच्यासह आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाना काटे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज चिंचवडला गेले आहेत. याआधीही पक्षाने आपल्याच नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे.
मतांच्या विभाजनाची चिंता
राहुल कलाटे रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीला मतांच्या विभाजनाची चिंता सतावत आहे. दुसरीकडे, उद्धव गटाचे अनेक स्थानिक नेते कलाटे यांना मदत करत असल्याने महाविकास आघाडीमधील तणाव वाढला आहे. यामुळे राहुल कलाटे यांना मदत करणाऱ्या शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेंनी कारवाई सुरू केली आहे.
2019 च्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेकडून बंडखोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांना मिळाली होती, त्यामुळे या जागेवर शिवसेनेकडूनही दावा केला जात होता.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर मुंबईहून थेट चिंचवडला पोहोचले होते. त्यांनी तब्बल अर्धा तास राहुल कलाटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चाही करून दिली. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला नाही.