तो जन्माला आला पण पोटात गर्भ घेऊन, पिंपरीत 18 महिन्याच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया !
एका अठरा महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pimpri-Chinchwad fetus in fetu surgery)
पिंपरी चिंचवड : एका अठरा महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाळावर पिंपरीतील एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार प़डली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचे मृत गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ही शस्त्रक्रिया पार पडली. (Pimpri-Chinchwad Successful surgery removed fetus in fetu in child body)
नेमकं प्रकरणं काय?
मूळ नेपाळच्या असलेल्या एका महिलेची 18 महिन्यांपूर्वी प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र त्याच्या जन्मानंतर त्याचे काही ना काही आरोग्याच्या तक्रारी असायच्या. अनेकदा त्याच्या पोटात प्रचंड दुखायचं. काही दिवसांपूर्वी तर त्याचं पोट हे गरोदर महिलांप्रमाणे वाढत होते.
त्या महिलेची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे ती महिला उपचारासाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल झाली. यानंतर बालरोग तज्ज्ञांनी त्या बाळाच्या सर्व चाचण्या केल्या असता एक धक्कादायक बाब समोर आली.
या बाळाच्या आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते. त्यातील एक गर्भ हा दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. पुढे जन्मानंतर बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत गेली. त्यामुळे बाळाला योग्य आणि पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या त्याच्या इतर अवयवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे मृत गर्भ (गाठ) शरीराबाहेर तातडीने काढणे गरजेचे होते.
गाठ वेगळी करणे शल्यचिकित्सकांसमोर आव्हान
यानंतर या बाळाच्या शरीराची सोनोग्राफी आणि सी टी स्कॅन अहवालाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार हा गर्भ बाळाच्या यकृत आणि उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आले. तसेच हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले. ही गाठ वेगळी करणे हे बाल शल्यचिकित्सकांसमोर फार मोठे आव्हान बनले होते.
मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत, मूत्राशय आणि आतडे या अवयवांना कोणतीही इजा होऊ न देता, ही संपूर्ण गाठ काढण्यात यश आलं. बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव आणि त्यांच्या टीमने यासाठी तब्बल सहा तास शर्थीचे प्रयत्न केले.
आतापर्यंत 200 प्रकरणांची नोंद
दरम्यान पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार 200 प्रकरणे आतापर्यंत नोंदवली आहेत. याला वैद्यकीय भाषेत ‘फिट्स इन फिटू’ (fetus in fetu) असे म्हणतात.
या बाळाच्या शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठीचे परीक्षण करण्यात आले. या गर्भ गाठीचे वजन 550 ग्रॅम असून हात आणि पायची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोपमध्ये इतरही अवयव दिसून आले. यावरुन हे ‘फिट्स इन फिटू’ असल्याचे निदान झाले. या गाठीमुळे बालकाला भविष्यात कोणताच धोका आणि दोष होणार नसल्याचे स्पष्ट झाले. (Pimpri-Chinchwad Successful surgery removed fetus in fetu in child body)
संबंधित बातम्या :
Benefits Of Ghee | दाट आणि चांगले केस पाहिजे आहेत?, पाहा खास टिप्स
Skin Care | आरोग्यासाठीच नव्हे तर, चमकदार त्वचेसाठीही लाभदायी ‘पेरूची पाने’, अशा प्रकारे करा वापर!