दिवाळीतील प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरतोय पिंपरीकरांचा ‘श्वास’
ठिकठिकाणी पडलेला हा कचरा, पालापाचोळाही महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने उचलणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. फक्त महापालिका कर्मचारीच नव्हे, तर नागरिकही कचरा जाळून प्रदूषणात भर घालत असल्याचे दिसून आले.
पिंपरी – दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांच्या कचऱ्यासह पालापाचोळा साफ करण्याचे कर्तव्य महापालिका प्रशासनाने पार पाडले. परंतु यावेळी संकलित झालेला कचरा कुंडीत न टाकता तो थेट जाळण्यात आला. कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण(Air pollution) निर्माण झालयाचे दिसून आले आहे. फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणात, आता जळालेल्या कचऱ्याने (waste) मोठी भर घातली आहे. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे हा कचरा जाळणारे महापालिकेचे कर्मचारीच होते. या कृतीमुळे महापालिकेची नागरिकांच्या आरोग्याबाबतची (health)अनास्था दिसून पुन्हा एकदा दिसून आली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकांना मनाप्रमाणे सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, या वर्षी परिस्थिती सुधारली. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यामुळे यंदा फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती शक्यता देखील खरी ठरली. मात्र दिवाळीत फटाके वाजवू नये, यासाठी विविध संस्था व महानगरपालिकेकडून प्रबोधनही करण्यात आले. त्यामुळे फटाके तुलनेने कमी फोडले गेले.
दिवाळीत घरोघरी, वसाहतींमध्ये, फटाके फोडले गेले. अनेक भागातमध्ये फटाके फोडण्यासाठी जागा नसल्याने लोकांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडले. त्यामुळे रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा झाला. महापालिका कर्मचारी सकाळपासूनच गल्लोगल्लीत झालेला कचरा साफ करण्यासाठी कामाला लागले. मुख्य रस्त्यांवरील कचरा त्यांनी साफ केला. परंतु, जास्त कचरा असल्याने प्रत्येक ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत. जे फटाके फोडले गेले, त्यामुळे झालेल्या कचऱ्याकडे नागरिकांनीही दुर्लक्ष केले. ठिकठिकाणी पडलेला हा कचरा, पालापाचोळाही महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने उचलणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. फक्त महापालिका कर्मचारीच नव्हे, तर नागरिकही कचरा जाळून प्रदूषणात भर घालत असल्याचे दिसून आले. उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि हिंदुस्थानी दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कठोर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, यासंबंधी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
वृक्षांच्या मुळांवर जाळला जातोय कचरा
शहरातील अनेक ठिकाणी वृक्षांच्या बुंध्याजवळ कचरा जाळला जात आहे. त्यामुळे उंबर, वड, पिंपळ, कडुनिंब अशी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांची मुळेदेखील जळाली आहेत. महापालिकेने वेळीच दक्षता घेऊन संभाव्य धोका टाळणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वृक्षांच्या बुंध्याजवळ कचरा जाळला जात असल्याने पर्यावरणाची हानी अन् वृक्ष कोसळण्याचा धोका वाढला आहे.
हे ही वाचा :
पुण्यात आज कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या शून्य ; उद्यापासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरु