पुणे : पुणे शहराचा विस्तार वेगाने होत आहे. मग पुणे शहर आणि परिसरातील भूखंड खरेदीसाठी पुणेकरांनी चांगलाच जोर लावला आहे. पुणे शहरातीलच नाही राज्यातील अनेक जण गुंतवणूक म्हणून पुणे शहरात भूखंड घेत आहेत. त्यामुळे शहरात आणि शहरानजीक भूखंड खरेदीत मोठी वाढ झाली आहे. पुणे परिसरातील भूखंडाला सोन्याची झळाळी मिळाली आहे. भूखंडाचे दर चांगलेच वाढले आहे. शहरापासून थोड्या लांब असलेल्या भूखंडालाही नागरिक पसंती देत आहे. गेल्या दहा वर्षात यंदा सर्वात जास्त जमिनीचा खरेदीचा विक्रम यंदा झाला आहे.
पुणे शहरात विक्रमी दर
पुणे शहरातील भूखंड विक्रीचा यंदा विक्रम झाला आहे. सण 2022 मध्ये अडीच हजाराहून जास्त जणांनी भूखंड खरेदी केली आहे. एकूण 2582 पुणेकरांकडून नवीन जमिनीची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पुणे शहरात गेल्या दहा वर्षात यंदा सर्वात जास्त जमिनीची खरेदी झाली आहे. खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे जमिनीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.
म्हाडाची मोठा भूखंड घेण्याच्या तयारीत
पुणे गृहनिर्माण विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडाने भूखंड खरेदीचा प्रयत्न सुरु केला आहे. सहारा उद्योग समूहाची धानोरी येथील तब्बल 107 एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव म्हाडाने तयार केला आहे. सुमारे 350 कोटी रुपयांना हा भूखंड घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी म्हाडाकडून पाठवला आहे. यामुळे म्हाडाला हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार ही जागा विकत घेण्यासाठी म्हाडाने तयारी दर्शविली आहे. सहाराला पिरामल फायनान्सवरील कर्ज फेडण्यासाठी हा प्लॉट विकायचा आहे. म्हाडाला हा भूखंड मिळाल्यास त्यांच्यांकडून या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी गगनचुंबी इमारती उभ्या केल्या जाणार आहेत.
प्राधिकरणाकडून मान्यता मिळाली
धानोरी येथील तब्बल 107 एकर जमीन विकत घेण्याकरिता गृहनिर्माणच्या प्राधिकरणाने म्हाडाला मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. या जागेचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पुढील तीस वर्षे म्हाडाला नियोजन करता येणार आहे. या जमिनीसाठी प्राधिकरणाकडून मान्यता मिळाली असली तरी आता राज्य शासनाची मान्यता बाकी आहे. राज्य शासनाने ही मान्यता दिल्यास म्हाडा मोठा गृहनिर्मिती प्रकल्प पुणे शहरात सुरु होऊ शकतो.