‘बड्या नेत्याने महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र अस्थिर केला’; मोदींचा शरद पवार यांच्यावर थेट हल्ला
"आजपासून 45 वर्षांपू्र्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या मार्गावर गेलं. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. विरोधक सरकार अस्थिर करत नाहीत. तर या आत्माच काहीतरी करतात", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं थेट नाव घेतलं नाही. पण त्यांचा थेट रोख कुणाकडे होता हे त्यांच्या टीकेतून स्पष्ट झालंय. नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात गेल्या 45 वर्षांपासून राज्यात वारंवार राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्यापाठीमागे शरद पवार असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली. काही भटकत्या आत्म्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पुण्यातील प्रचारसभेत केली.
“महाराष्ट्राने खूप काळ राजकीय अस्थिरता पाहिली आहे. मी आज काही सांगण्याआधी स्पष्ट करु इच्छितो की, कुणीही आपल्या डोक्यावर टोपी घेऊ नका. आमच्याइकडे म्हणतात की, काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असतात, अशा आत्मा भटकत असतात. मग स्वत:चं काम झालं नाही तर इतरांचं काम बिघडवण्यातही त्यांना मजा येते. आमचा महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
‘बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची…’
“आजपासून 45 वर्षांपू्र्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या मार्गावर गेलं. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. विरोधक सरकार अस्थिर करत नाहीत. तर या आत्माच काहीतरी करतात. ते आपल्या पक्षातही असंच काहीसं करतात. या आत्मा कुटुंबातही तसंच करतात”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. विशेष म्हणजे यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा होते.
“1995 मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाही या आत्म्याने ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये या आत्माने जनादेशाचा अपमान केला. ते महाराष्ट्राची जनता जाणते. विशेष म्हणजे आज देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवून देशाला स्थिर, मजबूत सरकारची आवश्यकता आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
मोदींची काँग्रेसवर सडकून टीका
“एनडीएचं सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी काम करत आहे. पण दुसरीकडे महाविकास आघाडीवाल्यांचं मॉडेल हे काँग्रेसच्या शाहजादेंना…. काँग्रेसच्या शाहजादेंना विचारा की, गरिबी कशी हटते तर ते म्हणतात खटाखट. शहाजादेंना विचारा की ग्रोथ कशी होते, तर ते म्हणात, ठकाठक. शाहजाद्यांना विचारा की, विकसित भारताला बनवण्याता काय प्लॅन काय आहे? ते म्हणतात, टकाटक. जग आज सांगत आहे की इंडस्ट्रींना भारत लीड करणार. पण काँग्रेस अधोगतीकडे ढकलण्यासाठी झुकत आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
“काँग्रेसचे लोक यांच्यामुळे काँग्रेस सोडून निघत आहेत. जे तरुणांनी आपले 15 ते 20 वर्षे काँग्रेसला दिले ते आज काँग्रेस सोडत आहेत. ते एक गोष्ट म्हणत आहेत की, काँग्रेसला माओवाद्यांनी ताब्यात घेतलं आहे. एक वेळ होती की, रेडिओ घेण्यासाठी लायसन्स खरेदी करावं लागायचं. आपल्याला पुन्हा लायसन्स राज्य हवं आहे का? मोदीचं स्वप्न आहे. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातून सरकार निघून जायला पाहिजे. गरिबाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा सरकार 24 तास उपस्थित राहायला पाहिजे. अन्यथा आज हे कागद आणा आणि तो कागद आणा. किती दिवस नागरिकांना परेशान करणार? 2047 पर्यंत ही सर्व किटकिट चालली जाईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.