पुणे शहराची लोकसंख्या एक कोटी कधी होणार? मनपाच्या अहवालातून आली माहिती समोर
Pune News : पुणे शहराची व्याप्ती चौहूबाजूंनी वाढत आहे. शहरात अनेक नवनवीन संधी येत आहे. यामुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे. येत्या काही वर्षांत पुण्याची लोकसंख्या एक कोटीवर जाणार असल्याचा पुणे मनपाचा अंदाज आहे.
पुणे | 27 जुलै 2023 : पुणे शहराचे आकर्षण राज्यातील नाही तर देशातील अनेकांना आहे. पुणे शहर शिक्षणाचे केंद्र आहे. पुणे शहरातील वातावरण चांगले आहे. संस्कृतीचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. रोजगाराच्या अनेक संधी पुण्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्याचा विस्तार चारही बाजूने होत आहे. पुणे शहरात अनेक परिसरातील गावांचा समावेश यामुळे करावा लागला. पुणे महानगरपालिकेने वार्षिक अहवाल तयार केला आहे. त्यात पुणे शहराची लोकसंख्या १ कोटी कधी होणार आहे, याची माहिती दिली आहे.
सध्या कशी आहे पुण्याची वाढ
पुणे महानगरपालिकेने लोकसंख्याची माहिती तीन पद्धतीने तयार केली आहे. इक्रीमेंटल वाढ (Incremental Increase) जिओमॅट्रीक वाढ (Geomatrical Increase), ॲरथमेटिकल वाढ (Arithmetical Increase) अशा या पद्धती आहेत. सध्या 2011 मधील जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 आहे. त्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये 34 गावांचा समावेश केला गेला. त्यानंतर 2047 मध्ये पुणे शहराची लोकसंख्या 1 कोटीवर जाण्याची शक्यता असल्याचे महानगरपालिकेच्या अहवालात म्हटले आहे. 2042 मध्ये पुण्याची लोकसंख्या 88 लाख 58 हजार 126 होईल. 2032 मध्ये ही लोकसंख्या 61 लाख 77 हजार 472 होईल, असे पुणे मनपाच्या अहवालात म्हटले आहे.
देशातील सातवे शहर
पुणे सध्या देशातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहराची सर्वात जास्त लोकसंख्या आहे. पुणे शहर पेठांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुणे शहरात प्रत्येक वारानुसार पेठा आहेत. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधावर पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठनंतर इतर अनेक पेठा आहेत. या पेठांचे परिसर म्हणजेच जुने पुणे आहे. त्यानंतर पुणे शहराचा विस्तार चारही बाजूने झाला आहे.
दोन नद्यांवर वसलेले शहर
पुणे शहर राज्याच्या पश्चिम भागात आहे. पुणे शहर मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे शहरात चांगल्या नागरी सोईसुविधा निर्माण झाल्यामुळे उद्योग मोठ्या प्रमाणावर पुण्यात आले. तसेच चांगल्या शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते.