31 ऑगस्टपूर्वी कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा सदनिका रद्द! PMRDAचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा इशारा
पुणे विभागात पंतप्रधान आवास योजनेतल्या (PM Housing Scheme) एक हजारहून अधिक लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी तात्काळ सर्व कागदपत्रं जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे : पुणे विभागात पंतप्रधान आवास योजनेतल्या (PM Housing Scheme) एक हजारहून अधिक लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी तात्काळ सर्व कागदपत्रं जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत ऑनलाईन सोडतीद्वारे (Online Lottery) लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड झाल्यानंतर लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणं बंधनकारक असतं. मात्र, पुणे विभागातल्या (Pune Division) तब्बल 1190 लाभार्थ्यांनी अद्याप आपल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी कागदपत्रं जमा करावीत अन्यथा, सदनिका रद्द करण्यात येतील असा इशारा पुणे महानगर विकास प्राधिकरणाने दिला आहे. (PMRDA has warned the beneficiaries of PM Housing Scheme to submit all the documents by August 31)
वारंवार सूचना देऊनही गैरहजर
पंतप्रधान आवास योजनेत ऑनलाईन सोडतीद्वारे निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रं तपासण्याचं काम 1 जुलै 2021 पासून सुरू आहे. मात्र, पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी 1190 लाभार्थी कागदपत्र तपासणीला गैरहजर राहिले आहेत. त्यांना यासंदर्भात वारंवार सूचनाही देण्यात आल्या मात्र, तरीही ते गैरहजर राहत आहेत. अशा लाभार्थ्यांना आता शेवटची संधी देण्यात आली आहे. 31 ऑगस्टपूर्वी कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. असं केलं नाही तर त्यांची सदनिका रद्द केली जाणार आहे.
गैरहजर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध
पीएमआरडीएच्या कार्यालयातल्या सेक्टर 12 इथल्या गृहयोजनेसाठी 21 मे 2021 रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. यात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी 1 जुलैपासून सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही यापैकी 1190 लाभार्थी कागदपत्रांच्या तपासणीसाठी गैरहजर आहेत. या गैरहजर राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी https://lottery.pcntda.org.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शेवटची संधी देण्याचा निर्णय
पंतप्रधान आवास योजनेत पात्र ठरल्यानंतर या लाभार्थ्यांना ई-मेल, मेसेजद्वारे वारंवार कळवण्यात आलं आहे. तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही. या लाभार्थ्यांना आता शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 ऑगस्टपूर्वी या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, अन्यथा त्यांना लॉटरीमध्ये मिळालेल्या सदनिका रद्द करण्यात येणार आहेत.
सदनिका लॉटरीच्या माध्यमातून इतरांना मिळण्याची संधी
31 ऑगस्टनंतर त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारे सहानुभुतीपूर्वक विचार केला जाणार नाही. मुदत संपल्यानंतर त्यांची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही, असं पीएमआरडीएने स्पष्ट केलं आहे. या ११९० लाभार्थ्यांपैकी कुणी दिलेल्या मुदतीत कागदपत्र जमा करू शकलं नाही तर त्यांच्या सदनिका लॉटरीच्या माध्यमातून इतरांना मिळण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या :