गौतमी पाटील कार्यक्रमाला आली, पण कार्यक्रम झाला नाही, तिच्याऐवजी…?; शिरूरमध्ये असं काय घडलं?
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा शिरूरमध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला गौतमी आली. पण ऐनवेळी तिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असतो. तिच्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड झुंबड उडते. त्यामुळे तिचे राज्यभरात कार्यक्रम होत असतात. सार्वजनिक मंडळांकडून तिच्या कार्यक्रमाला मोठी मागणी असते. हल्ली तर वाढदिवसाच्या निमित्तानेही लोक गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवत आहेत. त्यामुळे गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तरुणांची प्रचंड गर्दी होते. हुल्लडबाजी होते. पोलिसांना तरुणांवर लाठीमार करावा लागतो. पण तरीही तिचा कार्यक्रम होत असतो. शिरूरमध्ये मात्र पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. कार्यक्रमाची तयारी होऊनही कार्यक्रम रद्द करावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली. विशेष म्हणजे गौतमी स्वत: कार्यक्रमाला हजर झाली होती. त्यावेळी तिला कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगितलं गेलं. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. लाठीमार होतो. त्यामुळे पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचं सांगितलं जातं. मात्र गौतमीच्या ऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी केलं होतं. पोलिसांनी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये निरुत्साह निर्माण झाला होता.
ऐनवेळी परवानगी नाकारली
अण्णपूर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गाव आहे. या गावात यात्रेनिमित्त मनोरंजन म्हणून तमाशा ठेवण्याची परंपरा आहे. मात्र गेली कित्येक वर्ष या गावात तमाशाच्या कार्यक्रमात अनेकदा भांडण होत असतात. त्यामुळे शिरूर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास ऐनवेळी परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी न दिल्याने आयोजकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करून तिची सहकरी हिंदवी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
मी पुन्हा येईन
गौतमी पाटील पहिल्यांदाच कार्यक्रमस्थळी येऊनही तिला कार्यक्रम करता आला नाही. तिच्या ऐवजी हिंदवीचा कार्यक्रम ठेवला. गौतमीचा कार्यक्रम होणार नसल्याचं कळल्यावर सुरुवातीला रसिकांमध्ये नाराजी पसरली. मात्र, हिंदवीचा कार्यक्रम पाहिल्यावर गौतमीला भारी हिंदवी पाटील अशी चर्चा रंगली. मात्र, गौतमीने कार्यक्रम स्थळी हजेरी लावून प्रेक्षकांशी संवाद साधला आणि आपल्याला कार्यक्रम करता न आल्याने तिने तिच्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त केली. मी पुन्हा लवकरच या गावात येईल आणि पुढच्या वेळी नक्की डान्स करेल असे आश्वासन देखील गौतमी पाटील हिने तिच्या चाहत्यांना दिले.